रायगड - लॉकडाऊन काळात 13 एप्रिल पर्यंत अवैध दारू तस्करांवर 36 गुन्हे दाखल झाले असून 50 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 15 लाख 49 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
कोरोनामुळे शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त अन्य सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये मद्याची दुकाने आणि परमिट बार देखील बंद असल्याने तळीरामांचे चांगलेच हाल झाले आहेत. अशात काही ठिकाणी अवैधरित्या दुप्पट-तिप्पट दराने दारूची विक्री होत आहे. मात्र, अवैधरित्या दारू विकणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 14 एप्रिलपर्यंत आसणारे लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवले. यामुळे सध्या सर्व व्यवहार बंद पडले आहेत. तसेच घराबाहेर पडता येत नसल्याने तळीरामांच्या घशाची कोरड आणखी वाढत आहे. लॉकडाऊन हा तळीरामांसाठी वनवास ठरत आहे. त्यांची ही घालमेल पाहून काही जणांनी अनधिकृतपणे त्यांची 'व्यवस्था' केली होती. मात्र पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवत अशा महाभागांवर कारवाईचा बडगा उचललाय. पोलिसांनी 14 मार्चपासून ते 13 एप्रिलपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून 36 गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यातून 15 लाख 49 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून 50 जणांना अटक करण्यात आलेली आहे.