रायगड - कोरोना महामारीने सर्वांनाच आर्थिक फटका बसला तसेच जिल्ह्यातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या 401 महिलांची आर्थिक कुचंबणा झाली. मात्र या परिस्थितीतही शासन त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहे. जिल्ह्यातील 401 वारांगनांना कोरोना काळात प्रत्येकी 20 किलो तांदूळ आणि गहू तीन महिन्यासाठी देण्यात आले. जीवनवश्यक धान्य तसेच 61 लाखांची भरीव मदत शासनाने केली आहे. त्यामुळे कोरोना काळात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या खात्यात दरमहा पाच हजार रुपये जमा होणार आहे. तर मुलांच्या शिक्षणासाठी अडीच हजार रुपयेही जमा करण्यात येणार आहे.
मार्च महिन्यापासून वारांगना आर्थिक अडचणीत
मार्च महिन्यापासून देशात कोरोनाची लाट पसरली आणि शासनाने टाळेबंदी लागू केली. टाळेबंदीने सर्व व्यवहार, उद्योग बंद पडले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. छोटे मोठे व्यवसायिक, सर्व सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले. कोरोना महामारीचा फटका सर्वाधिक देहविक्री करणाऱ्या वारांगानाही बसला. टाळेबंदी असल्याने कामा व्यतिरिक्त बाहेर पडण्यास बंदी शासनाने घातली. त्यामुळे वेश्यांना गिऱ्हाईक मिळणे कठीण झाले. यानंतर त्यांची परिस्थिती खालावली.
सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती याचिका
देहविक्री करणाऱ्या महिलांना कोरोना काळात उत्पन्न नसल्याने शासनाने त्यांना आर्थिक मदत देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार राज्य शासनाने वारांगनांना आर्थिक मदत देण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने मदत मंजूर केली आहे.
जिल्ह्यातील 401 वारांगनांसाठी 61 लाखांची मदत
महाविकास आघाडी सरकारने राज्यतील हजारो वारांगनांच्या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन 51 कोटी 11 लाख 97 हजार 500 रुपयांची भरीव मदत दिली आहे. रायगड जिल्ह्यातही 61 लाख 27 हजार 500 रुपये निधी हा जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे. जिल्ह्यातील 401 वारांगना असून त्याची यादी राज्य एड्स नियंत्रण बोर्ड, जिल्हा एड्स नियंत्रण आणि पुनर्वसन मंडळ, तसेच सामाजिक संस्थेच्या मार्फत तयार केली आहे.
वारांगनाच्या खात्यात जमा होणार पाच हजार रुपये
जिल्ह्यातील 401 वारांगनांना तीन महिन्यांसाठी 24 क्विंटल तांदूळ आणि गहू या जीवनावश्यक धान्याचे वाटप केले जाणार आहे. पहिल्या टप्यातील 8 क्विंटल धान्याचे प्रत्येकी 20 किलोचे वाटप जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यलयामार्फत होणार आहे. तसेच या वारांगना महिलांची बँकेत खाती उघडून दरमहा पाच हजार तर शिक्षण घेत असलेल्या त्यांच्या मुलाच्या नावे अडीच हजार, असे साडे सात हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत.
बँक खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू
कोरोनामुळे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची आर्थिक कुचंबणा झाली आहे. यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे केला. त्यानुसार या महिलांना पहिल्या टप्यातील धान्य वाटप केले आहे. तसेच शासनाचा निधी हा जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झाला आहे. 401 महिलांची एकत्रित खाती काढल्यानंतर शासनाने मंजूर केलेली रक्कमही वर्ग केली जाणार आहे. महिलांची बँकेत खाते उघडण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होऊन पैसे वर्ग केले जातील, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उज्ज्वला पाटील यांनी दिली आहे.