रायगड - जिल्ह्यात ३ जूनच्या निसर्ग चक्रीवादळामुळे या अनेक भागात वीज नाही. तसेच अनेक कुटुंबियांकडे दिवे लावण्यासाठी केरोसीन देखील नाही. त्यामुळे राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून बाधित कुटुंबांना मोफत केरोसिनचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील इतर नुकसानग्रस्त जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांची मागणी असल्यास त्यांनाही केरोसीन पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
यावेळी भुजबळ म्हणाले, केंद्र शासनाने नैसर्गिक आपत्ती, मत्स्यव्यवसाय, धार्मिक समारंभ, यात्रा व मेळावे इत्यादी प्रयोजनांकरता विनाअनुदानित दराचे केरोसीन राज्यास उपलब्ध करून दिले आहे. त्यानुंषगाने रायगड जिल्हयामध्ये 3 जून 2020 रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटूबांना प्रति कुटूंब मोफत केरोसीन उपलब्ध करून देण्यासाठी मागणी करण्यात आली होती. त्यानुषंगाने जिल्हयातील 7 लाख 69 हजार 335 इतक्या शिधापत्रिकाधारकांना प्रतिशिधापत्रिका 5 लिटर केरोसीन वितरित करण्यासाठी विनाअनुदानित दराचे केरोसीन मंजूर करण्यात आले आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबांना वाटप करण्याच्या विनाअनुदानित केरोसीनची उचल संबधित घाऊक केरोसीन परवानाधारकांमार्फत तेल कंपन्यांच्या संबंधित डेपोतून करावी. त्याचे वितरण बाधित कुटुंबांना प्रति कुटूंब 5 लिटर प्रमाणे करण्यात यावे. हे वितरण शक्यतो रास्तभाव दुकान/किरकोळ केरोसिन परवानाधारकांमार्फत करण्यात यावे. मात्र, विशिष्ट परिस्थितीत वेगळी कार्यपध्दती विहित करण्याची मुभा जिल्हा प्रशासनास राहील. घाऊक केरोसीन विक्रेत्यांनी केरोसीनच्या नियमित नियतनाप्रमाणे तेल कंपन्यांच्या डेपोमध्ये किंमतीचा भरणा करुन या केरोसीनची उचल करावी. त्यामुळे उचल व वितरणाच्या नियमित पध्दतीत कोणताही बदल राहणार नाही.
जिल्हा प्रशासनाने बाधित कुटुंबाना वितरित होणाऱ्या केरोसीनचा एक्स डेपो दरासह सर्व खर्च (घाऊक विक्रेत्याचे कमीशन, वाहतूक खर्च, लागू असेल तेथे अर्ध-घाऊक विक्रेत्यांचे कमीशन, किरकोळ विक्रेत्यांचे कमीशन इ.) सुरुवातीला संबंधित केरोसीन विक्रेत्यांनी राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून करावा लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटूंब म्हणून निश्चित केलेल्या कुटुंबांनाच केरोसीनचे मोफत वितरण करण्यात यावे. अपात्र कुटूंबांना मोफत केरोसीनचे वितरण करु नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.