कर्जत (रायगड) - कर्जत तालुक्यातील नालढे येथे बंगल्यामध्ये पर्यटनासाठी आलेले तरुण-तरुणी चिल्हर नदीपात्रात वाहून गेल्याची घटना शनिवारी (दि.21 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास घडली होती. त्या दोघांचे मृतदेह रविवारी (दि. 22 ऑगस्ट) पोलिसांना आढळले आहेत. आडबाजूला पाण्याच्या ठिकाणी पर्यटक डुंबायला जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तर यामुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. तर दुसरीकडे वस्त्यांपासून आडबाजूला असलेल्या बंगल्यांमध्ये पर्यटकांची व्यवस्था करणारे आपली जबाबदारी नसल्याप्रमाणे वागत असल्याने अशा अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला अन् दोघे गेले वाहून
कर्जत शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गालगत नालढे येथे स्पर्श हा बंगलो प्रोजेक्ट आहे. गेले अनेक वर्षे सुरू असलेल्या या बंगलो प्रकल्पात काही जणांनी बंगले विकत घेतले आहेत. तर काही बंगले अद्यापही पडून आहेत. शहरापासून, गाव, वस्त्यांपासून लांब असे हे ठिकाण आहे. कर्जत हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी पर्यटकांचा ओढा कायम असतो. हे पाहून येथील अनेक जण आपले बंगले पर्यटकांना राहायला देतात. असाच येथील एक जॉय नावाचा बंगला बलजीत पुलवंत सिंग (वय 31 वर्षे राहणार कळंबोली), आणि निकिता किशोर मगावकर (वय 23 वर्षे, रा. जोगेश्वरी) यांनी ऑनलाइन बुक केला होता. त्यानुसार ते शुक्रवारी येथे राहण्यासाठी आले होते. शुक्रवारी राहिल्यानंतर दोघांनी शनिवारी बांगला सोडला. त्यानंतर दुपारी मद्यपान करून दोघेही पुन्हा याठिकाणी आले. तसेच मागील चिल्हार नदीच्या किनारी पाण्यात दोघेही खेळत होते. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोघेही त्यात वाहू लागले. घटनास्थळ आडबाजूला असल्याने या ठिकाणी लोकांचे वास्तव्य नाही. यामुळे मदतीला कोणीही पोहोचले नाही. त्यामुळे दोघेही पाण्यात वाहत होते. काही अंतरावर निकीता पाण्यात वाहताना ग्रामस्थांना दिसली. पण, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मदतीसाठी न धावता नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
दुसऱ्या दिवशी मिळाला मृतदेह
माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर ह आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांनी दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण, पाण्याचा वाढता प्रवाह व वाढता काळोख यामुळे शोधकार्य थांबवावे लागले. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी (दि. 22 ऑगस्ट) पुन्हा एकदा शोधकार्य सुरू करण्यात आला. त्यावेळी निकिताचा मुतदेह सुगवे पुलाजवळ आढळून आला तर बलजित याचा मृतदेह हा गुडवनजवळ नदीपात्रात आढळून आला. हे दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्या घरच्यांना बोलावले.
बेजबाबदार बंगलो मालकांवर प्रशासन कारवाई करणार का..?
कर्जत तालुक्यातील पाणवठ्याच्या ठिकाणी पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे. तरीही तालुक्यातील मागील काही घटना पाहता अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून पोलीस प्रशासन सज्ज असते. त्यामुळे अशा आडबाजूला पर्यटक आसरा शोधात असतात. एकांत असलेल्या ठिकाणी धिंगाणा घालण्यासाठी अतिउत्साह तरुण स्पर्श बंगलोसारख्या ठिकाणी येत असतात. मात्र, अशा भागात नवख्या पर्यटकांना धोक्याच्या ठिकाणी जाण्यास कुणीही अडवत नाही. किंबहुना त्यांची जबाबदारी कुणी घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत तालुक्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, अशा पर्यटकांच्या बुकिंग घेऊन त्यांची जबाबदारी झिडकारत त्यांना मृत्यूच्या खाईत ढकलणाऱ्या बेजबाबदार बंगलो मालकांची माहिती घेत प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - रक्षाबंधन : खोपोलीत दिव्यांग विद्यार्थिंनींचा पोलीस दादाच्या कर्तुत्वाला राखी बांधून सलाम