रायगड - आज ५९ वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत आहे. त्याचबरोबर कामगार दिनही आजच्याच दिवशी साजरा केला जातोयं. कामगार दिन हा कामगारांचा दिवस असूनही जिल्ह्यातील रोजंदारीवर काम करणाऱया कामगारांची जिंदगी मात्र भाकरीचा चंद्र शोधण्यातच बर्बाद झालीय. कामापासून त्यांची सुटका कधीच झाली नाही. जिल्ह्यातील कामगार नाक्यावर आजही अनेक कामगार हाताला काम मिळेल या आशेने जमलेले आहेत. कारण कामगार दिवस साजरा केला तर संध्याकाळी त्याच्या घरात चूल पेटणार नाही, अशी परिस्थिती आजही या कामगारांची आहे.
३६५ दिवस काम करणाऱ्या कामगारांना या दिवशी हक्काची सुट्टी असते. कंपनीमध्ये वा उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्यांना हा दिवस आपला वाटत असला तरी हातावर पोट असणाऱ्या कामगारांना मात्र, या दिवशीही काम चुकले नाही.
अलिबाग शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी कामगार नाके आहेत. कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागातील लोक कामानिमित्त रायगड जिल्ह्यात आपले पोट भरण्यासाठी आलेले आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्यगिक, बांधकाम क्षेत्र विस्तारित आहे. त्यामुळे या क्षेत्रात कामगारांची मागणी आहे. त्यामुळे अलिबाग शहरात महेश टॉकीज परिसरात सकाळी मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष मंडळी कामगार नाक्यावर उभी असलेली पाहायला मिळतात. महिला आपल्या लहानग्यांना घेऊनच कामाच्या ठिकाणी जात असतात. पती पत्नी दोघेही काम करीत असल्याने दोघांनाही मजुरी मिळत असते. त्यावर त्याच्या कुटुंबाचे पोट भरते.
..तर घरात चूल पेटणार नाही-
१ मे हा कामगार दिवस म्हणून साजरा होत असला तरी या कामगारांना मात्र सगळे दिवस सारखे असल्याचे लक्ष्मण राठोड यांचे म्हणणे आहे. कामगार दिन म्हणून घरी बसून आराम केल्यास घरात चूल पेटणार नाही. त्यामुळे कामगार दिवस असूनही आम्हाला काम करावेच लागते, असे लक्ष्मण राठोड व शाहिदुल शेख या कामगारांनी सांगितले.
कामगार दिन असूनही रोजंदारीवर काम करणारे नाका कामगार हे कामगारांचे हक्क, अधिकारापासून अनभिज्ञ आहेत. शासनाने मोलमजुरी करणाऱ्या कामगारांसाठी योजना केल्या आहेत, मात्र त्या कामगार वर्गापर्यंत पोहचत नसल्याचे विजय मिस्त्री यांचे म्हणणे आहे.