रायगड : दरवर्षी गोविंदा आला रे, म्हणत उत्साहात दहीहंडीचा सण साजरा केला जातो. मात्र, यावर्षी या गोपाळकाला सणाला असे काहीच दिसले नाही. आज जिल्ह्यात काही ठिकाणी गोपाळकाला साधेपणाने साजरा केला गेला. तर काहींनी आरोग्यदायी गोविंदाची हंडी फोडली. मात्र, यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे असलेला उत्साह कुठेच पाहायला मिळाला नाही.
गोविंदा म्हटलं की, सगळीकडे गोपाळांचा जल्लोष, गावागावात, शहरात लावलेल्या उंच उंच दहीहंड्या, दहीहंडी फोडण्यासाठी लावलेले एकावर एक थर, गोविंदा खेळताना लावलेल्या फळ्या, गोविंदाची गाणी, गोविंदाचा प्रसाद घेण्यास उडालेली गोपाळांची गर्दी, अंगात आलेले वारे, टीमकीचा सूर आणि त्यावर नाच करणारे गोविंदा असे प्रसन्न वातावरण पाहायला मिळायचे. मात्र, यावर्षी सर्व धार्मिक सणावर कोरोना संकटाची टांगती तलवार आहे. त्यामुळे सर्व धर्मीय हे आपला सण साधेपणाने साजरा करीत आहे. श्रीकृष्ण जन्मदिवस साजरा झाल्यानंतर दुसरा दिवस हा गोपाळकाला सण म्हणून साजरा केला जातो. सगळीकडे दहीहंडीचा उत्साह असतो. थरावर थर लावून उंच लावलेली दहीहंडी फोडण्याची चुरस गोविंदा पथकामध्ये लागलेली असते. मात्र यावर्षी कोरोनामुळे दहीहंडीचा थरार पाहण्यास मिळाला नाही.
राज्यासह रायगडातही गोपाळकाला दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे जनतेच्या आरोग्यावर टांगती तलवार असल्याने अनेक ठिकाणी हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनामुळे गर्दी टाळण्याचे नियम आहेत आणि गोपाळकाला हा गर्दीचा सण असल्याने आज साजरा झालेला गोपाळकाला काहींनी नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा केला आहे.