रायगड - खोपोली प्रशासनाने वेळोवेळी उचललेल्या ठोस पाऊलांमुळे व कडक लॉकडाऊनमुळे खोपोली शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने घट होत आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गर्दीचे हॉटस्पॉट ठरणाऱ्या भाजी मंडईत भाजी विक्रेत्यांनी केलेल्या सहकार्यामुळे खोपोली नगरपालिका प्रशासन व खोपोली पोलिसांनी नियोजन करुन फक्त सकाळी 11 वाजेपर्यत भाजी मंडई सुरू ठेवली होती. तौक्ते वादळातून नागरिकांना सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 19 मे रोजी नवी नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार दुकाने पूर्ण वेळ सुरुवात ठेवण्यात येणार असल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे खोपोली भाजी मंडईतील गर्दी ओसरू लागल्याचे पाहायला मिळत आहे.
नवीन नियमावलीचा अनेक उद्योग धंद्याना दिलासा
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असून, अत्यावश्यक सेवेतील दुकानांसह अन्य काही दुकाने आता पूर्ण वेळ सुरु ठेवण्याची परवानगी रायगड जिल्हा प्रशासनाने दिली आहे. रायगड जिल्हाधिकारी यांनी याबाबतचे एक पत्रक 19 मे रोजी जाहीर केले आहे. या नवीन नियमावलीनुसार किराणा, भाजीची दुकाने, फळ विक्रेते, चिकन, मटण, मासळी विक्रेते, रेशन दुकानदार, फेब्रिकेशनची कामे करणारी अस्थापने, शेतीची अवजारे व या संबंधित दुकाने, पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी कामे आदी तसेच सिमेंट पत्रे, ताडपत्री, विद्युत उपकरणे तसेच हार्डवेअरची दुकाने या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत. सध्या ही दुकाने सकाळी अकरा नंतर बंद करण्यात येत आहेत. मात्र नवीन आदेशानुसार आता ही दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवता येणार आहेत.
भाजी मंडई संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सुरू राहणार
दरम्यान सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंतच भाजी मंडई व अन्य बाजारपेठ सुरू राहत असल्याने भाजी मंडई व अन्य ठिकाणी मोठया प्रमाणावर गर्दी होत आहे. या गर्दीत कोरोना नियम व सुरक्षीत अंतर पाळले जात नसल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. ही गर्दी व अन्य अडचणी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अनेकांना सवलती देण्यात आल्या आहेत. तसेच वेळेत वाढ करून दररोज सकाळी सात ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत भाजीपाला मंडईसह अन्य दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुकानदार व ग्राहकांनी नियमांचे पालन करण्याचे केले आवाहन
याबाबत जिल्हा प्रशासनाकडून घेतलेल्या निर्णयामुळे खोपोली व परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. यासाठी नियमावली बनविण्यात आली असून दुकानातील अंतर वाढविण्यात आले आहे. तसेच कोणत्याही स्थितीत कोरोना नियमाअंतर्गत दुकानदार व ग्राहकांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई होणार असल्याचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी सांगितले आहे. तसेच दुकानदार व ग्राहकांना सूचना देऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा - अनंतनागच्या कोकेरनागमध्ये आहे आशियातील सर्वात मोठी 'ट्राउट मत्स्य शेती'