रायगड - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या आठवड्याला मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे, राज्यात रायगड जिल्हा हा पॉझिटिव्हिटी टक्केवारीत अग्रस्थानी आहे. सध्या पॉझिटिव्हीटी दर हा 14.28 टक्के एवढा आहे. त्यामुळे, रायगड जिल्हा हा रेड झोनमध्ये असून सध्या कडक निर्बंध लावलेले आहेत. जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी दर कमी करण्यासाठी गावागावांत, तसेच गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचण्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिली.
हेही वाचा - रायगडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे दोन वेगवेगळे आदेश, व्यापारी संभ्रमात
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर हा 14.28 टक्के
रायगड जिल्ह्यात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्ह होण्याचा दर हा जास्तच होता. हळूहळू हा दर कमीही झाला. मात्र मार्च 2021 पासून सुरू झालेल्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. आठवड्याला हा दर 18 टाक्यांच्या वर गेला होता. गेल्या आठवड्यापासून पॉझिटिव्हिटी रेट हा कमी झाला असून सद्यस्थितीत तो 14.28 टक्क्यांवर आला आहे. 25 ते 31 मे दरम्यान 32 हजार 506 चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये आरटीपीसीआरच्या 20 हजार 414, अँटिजेन 11 हजार 955, सीबीनाट 39, ट्रुनट 98 तपासण्या करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील बेडची उपलब्धता
जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात जनरल बेड 3 हजार 560, ऑक्सिजन बेड 2 हजार 575, आयसीयू बेड 640 तर व्हेंटिलेटर बेड 256 एवढी क्षमता आहे. रायगड ग्रामीण व पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय व खासगी रुगणालायांत 2 हजार 124 रुग्ण दाखल आहेत. जनरल बेडवर 758, ऑक्सिजन बेडवर 1 हजार 21, आयसीयूमध्ये 344, तर व्हेंटिलेटरवर 167 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात बेडच्या प्रमाणात 31.35 टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. जनरल बेडवर 21.29 टक्के, ऑक्सिजन बेडवर 39.65 टक्के, आयसीयूत 54.75 टक्के, तर व्हेंटिलेटरवर 65.23 टक्के रुग्ण बेडवर उपचार घेत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात जनरल बेड 2 हजार 802,
ऑक्सिजन बेड 1 हजार 554, आयसीयू बेड 296, 89 व्हेंटिलेटर बेड रुग्णांसाठी शिल्लक आहेत.
जिल्ह्यात 6 हजार 429 रुग्ण अॅक्टिव्ह
जिल्ह्यात 2 लाख 83 हजार 406 पॉझिटिव्ह रुग्ण होते. यापैकी 1 लाख 23 हजार 618 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 3 हजार 192 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 6 हजार 429 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गावागावांत आणि गर्दीच्या ठिकाणी करणार कोरोना चाचणी
जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव हा वाढला असून यावर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून आता खबरदारीची पावले उचलली जात आहेत. आरोग्य यंत्रणेकडून गावागावांत जाऊन नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणीही तपासणी सुरू केली गेली आहे. त्यामुळे, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यास आता प्रशासनाने कंबर कसली आहे.
पॉझिटिव्हिटी रेट वाढण्याची कारणे
जिल्ह्यात पूर्वीप्रमाणे नागरिक स्वतःहून कोरोना चाचणी करण्यास पुढे येत नाहीत. त्याचबरोबर, खासगी रुग्णालयात केलेल्या तपासणीचे पॉझिटिव्ह रिपोर्ट येत असले तरी निगेटिव्ह रिपोर्ट लवकर येत नाहीत. तर, निगेटिव्ह रिपोर्ट सिस्टममध्ये टाकण्यास वेळ लागत आहे. त्याचबरोबर, जिल्ह्यात लग्न सराई, घरगुती कार्यक्रम यावर निर्बंध असूनही कोरोनाच्या नियमाचे पालन होत नाहीत. बाजारात वाढणारी गर्दी यावरही कुठे काटेकोरपणे लक्ष दिले जात नाही.
नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन
जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या अनुषंगाने नागरिकांची गावागावांत, गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे, नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांनी केले.
हेही वाचा - महाविकास आघाडीत विसंवाद नाही - अजित पवार