रायगड - शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी आचारसंहिता भंग केल्याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली. आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांचे वकील अॅड. सचिन जोशी यांनी ही तक्रार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अलिबाग यांना अॅड. सचिन जोशी यांनी दिलेल्या तक्रारीबाबत कार्यवाही करून कार्य अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराकरता कार्य अहवालाची सिंहावलोकन ही पुस्तिका काढलेली आहे. मात्र, या पुस्तिकेवर कुठेही प्रकाशक, वितरक व किती प्रति छापल्या आहेत? याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. प्रचारात कार्य अहवालाचा वापर करताना त्याबाबतची सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेणेही गरजेचे आहे. मात्र, अशी कोणतीही परवानगी व प्रकाशक, वितरक, प्रती याची माहिती छपलेली नाही. यामुळे आचारसंहिता भंग झाली असल्याबाबत आघाडीचे उमेदवार तटकरे यांच्या वतीने अॅड. सचिन जोशी यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
अनंत गीते हे वारंवार सुनील तटकरे यांच्या विरोधात व्यक्तिशः खोटे व खोडसाळ आरोप करत आहेत, असेही तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अलिबाग यांना या तक्रारीनुसार कारवाई करून कार्य अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले आहेत.