रायगड (पनवेल) - महानगरपालिका क्षेत्रातील काही भागात पावसाळ्यात प्रचंड पाणी साचून पूरस्थिती निर्माण होते. हे पाण्याचे सुयोग्य नियोजन करुन पुरापासून पनवेलवासीयांचे रक्षण करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने पनवेल शहरात असणाऱ्या गाढी नदीचे पात्र मोठे करण्याची मागणी शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांनी केली आहे.
पनवेल शहरात पावसाळ्यात पाणी जाण्यासाठी पुरेशी जागा नाही. व्यावसायिक कामे आणि वाढलेल्या जलपर्णीमुळे गाढी नदीचे पात्रही अपुरे पडत आहे. या कारणांमुळे पनवेल शहरात मागील 8 वर्षांपासून पूरस्थिती निर्माण होत आहे. बावन बंगला, मिडल क्लास सोसायटी, मुस्लिम मोहल्ला तसेच पनवेलच्या सखल भागात ही पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून गाढी नदीच्या पात्रात पाणी जाण्यासाठी अतिरिक्त स्त्रोत निर्माण व्हावेत अशी चर्चा करण्यात आली.
गाढी नदीपात्रात व्यावसायिकाने पुलाचे काम केले तेव्हा गोळा झालेला राडारोडा हा नदीत टाकण्यात आला. त्यामुळे पाणी जाण्याला अडथळा निर्माण झाला आहे. जर या नदीपात्राची योग्य रीतीने स्वच्छता करून संवर्धन झाले तर पनवेलमधील पूरस्थिती टळेल, असा विश्वास आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला. त्या अनुषंगाने त्यांनी गाढीनदीपात्रात पाहणी दौरा केला.