रायगड - देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत काही दिवसांपूर्वी खाकी वर्दी विरोधात काळे कोट अर्थात पोलिसांविरोधात वकिल असा संघर्ष पहायला मिळाला. त्यापाठोपाठ आता पनवेलमध्येही वकील विरुद्ध प्रांताधिकारी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांच्या कारभाराबाबत नाराज झालेल्या, बार असोसिएशनच्या वकिलांनी नुकताच प्रांताधिकाऱ्यांच्या विरोधात मोर्चा काढला होता.
हेही वाचा... पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पवारांनी केले टि्वट, म्हणाले...'शेतकऱ्यांच्या समस्यांवर मोदींशी केली चर्चा'
प्रक्रियेनुसार सर्वात आधी तहसीलदार आणि नंतर प्रांताधिकारी यांच्याकडे महसुली दावे चालतात. यातील वादी प्रतिवादी त्यांच्यासमोर युक्तिवाद करतात. तहसील कार्यालयात निकाल लागल्यानंतर समाधानकारक निकाल मिळाला नाही, तर प्रांत अधिकाऱ्यांकडे अपील केले जाते. ते याप्रकरणाची सुनावणी घेऊन निकाल देतात. एक प्रकारे येथे न्यायालयीन प्रक्रिया चालते. प्रांताधिकारी न्यायदंडाधिकारी असतात. त्यांच्याकडे अनेक महसुली दाव्यांच्या प्रकरणाची सुनावणी होते. पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या कार्यपद्धतीवर मात्र पनवेल तालुका वकील संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा... नागपूरच्या रेस्टॉरेंटमध्ये ५ लाखांचा वेटर रोबोट
पनवेलचे बार असोसिएशनचे सभासद असलेले वकील संतोष लाड यांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी बेकायदा नोटीस पाठविली होती. ही नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द देखील केली. सदस्य म्हणून पनवेल बार असोसिएशनकडे संतोष लाड यांनी तक्रार केली आहे. दत्तात्रय नवले हे न्यायालयाची मर्यादा ओलांडून मनमानी कारभार करून सर्व वकीलवर्गास अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोपही यावेळी वकिलांनी केला आहे.
हेही वाचा...भाजप-शिवसेनेची महायुती तुटल्यानंतर अमित शाह प्रथमच येणार महाराष्ट्रात
उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले यांना याबाबत विचारले असता, त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. मला माझ्या पदावर बसल्यानंतर प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी तक्रारदारांना योग्य तो न्याय देतो आहे. वैयक्तिक आकसापोटी कोणी असे आरोप करीत असेल तर त्यामध्ये काही तथ्य नाही, असे मत दत्तात्रय नवले यांनी व्यक्त केले आहे.