रायगड - जिल्ह्यातील कारखाने पूर्ण बंद करणार असतील तरच त्या लॉकडाऊनला अर्थ आहे. अन्यथा नागरिकांसाठी लॉकडाऊन आणि कंपन्यांना रेड कार्पेट अशी अवस्था असेल तर लॉकडाऊनला काहीच अर्थ नाही, असे मत जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माणिक जगताप यांनी व्यक्त केले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 15 ते 24 जुलै दरम्यान दहा दिवसाचे लॉकडाऊन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दहा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा, मेडिकल दुकाने, फार्मा कंपन्या आणि केंद्राने परवानगी दिलेल्या कंपन्या सुरू राहणार आहेत. तर किराणा दुकान, मटण, चिकन, भाजीपाला, मासळी बाजारही बंद राहणार आहे. त्यामुळे हा दहा दिवसाचा कडक लॉकडाऊन असणार आहे. कोरोनामुळे आधीच तीन महिने लॉकडाऊन होते. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. त्याचा फारसा परिणाम दिसला नाही. रुग्णाची संख्या वाढत आहे तरीही जनजीवन सुरुळीत आहे.
नागरिकांनी सहा महिन्यात खूप भोगले आहे. पुन्हा आता लॉकडाऊन जाहीर करताना नागरिकांसाठी एक नियम आणि कंपन्यासाठी वेगळा नियम लावला जात आहे. जिल्ह्यातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे लॉकडाऊन करायचे असेल तर जिल्ह्यातील सर्व कंपन्या 100 टक्के बंद करा तरच त्या लॉकडाऊनला अर्थ आहे. अन्यथा काहीच उपयोग नाही असे परखड मत जिल्हा काँग्रेस अध्यक्ष जगताप यांनी मांडले आहे.