रायगड - खालापूर तालुक्यातील कोप्रान कंपनीमध्ये दिपाली लोणकर या काम करत होत्या, मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना कामावरून तडकाफडकी काढून टाकण्यात आले होते. त्यमुळे दिपाली यांनी कंपनीविरोधात खालापूर तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिपाली लोणकर यांची भेट घेतली आहे. दिपाली यांना न्याय मिळून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, कंपनीविरोधात दिपाली लोणकर यांचे उपोषण सुरू आहे. त्यांना न्याय मिळून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या घटनेबाबत कामगार आयुक्तांशी चर्चा करून त्यांना सर्व माहिती देण्यात आली आहे. लवकरच दिपाली लोणकर यांना न्याय मिळेल. असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.
कामावर रुजू केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही
कामावरून अचानक काढल्यामुळे दिपाली लोणकर यांनी कोप्रान कंपनीविरोधात उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत कंपनी पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश देणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे दिपाली लोणकर यांनी म्हटले आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
खालापूर तालुक्यातील कोप्रान या औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये दिपाली लोणकर या गुणवत्ता मापन विभागात काम करत होत्या. 25 नोव्हेंबर रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. दरम्यान अचानक काढून टाकण्यात आल्याने दिपाली यांनी कंपनीविरोधात उपोषणाला सुरुवात केली आहे. माझी आर्थिक परिस्थिती बिकट असून, 7 वर्षांच्या मुलीची माझ्यावर जबाबदारी आहे. कंपनीने मला परत कामावर रुजू करावे अशी मागणी दिपाली यांनी केली आहे. तहसीलदारांनी या प्रकरणी संबंधित महिला व कंपनी प्रशासन असे दोघांचे म्हणणे ऐकूण घेतले, मात्र यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. जेव्हा कामावर पुन्हा घेतले जाईन, तेव्हाच उपोषण सोडणार असल्याचे दिपाली यांनी सांगितले.