रायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांचा 346 वा शिवराज्यभिषेक सोहळा गुरुवारी रायगड किल्ल्यावर मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पार पडला. यावेळी हजारो शिवभक्तांनी रायगड किल्ला हा भगवामय झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला होता. युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीतील पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी पहिल्यांदाच शेतकरी बांधवांना छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिषेक करण्याचा मान मिळाला.
खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार भरत गोगावले, राजीप अध्यक्ष अदिती तटकरे त्याचबरोबर ग्रीस, चीन, बल्गेरिया, पोलंड आणि टय़ुनिशिया या देशाचे राजदूत हा सोहळा पाहण्यासाठी खास उपस्थित राहिले होते.
यंदा ‘जागर शिवकालीन युद्धकलेचा’ व ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे कार्यक्रम आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शिवभक्तांकडून दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या मदतीसाठी निधीदेखील गोळा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या शिवभक्तांनी आपल्या हातात एक पिशवी घेऊन येऊन गडावरील पडलेला कचरा भरून नेण्याचे आवाहन युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केले होते.
राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीतील पुतळा व परिसर सुंदर अशा फुलांच्या आरासने सजवण्यात आला होता. राजसदरेपासून ते होळीच्या माळरानापर्यत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीची पालखीतून मिरवणूक काढली होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना खास आमंत्रित केले होते. त्यांच्या हस्ते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची यथासांग पूजा करण्याचा मान देण्यात आला होता. यावेळी मैदानी कवायती खेळ उपस्थितांसमोर शिवभक्तांनी सादर केले.
जिल्हा पोलीस दलाकडून रायगड किल्ल्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 500 पोलीस अधिकारी व कर्मचारी 5 जूनपासून रायगड किल्ल्यावर तैनात करण्यात आले होते.