रायगड - मराठा समाजाला त्याच्या हक्काचे आरक्षण मिळावे यासाठीच आता आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. यामागे कोणतेही राजकारण नसून हा अराजकीय लढा आहे. आम्ही ५ मागण्या दिल्या आहेत, त्या मान्य करण्यास सर्वोच्च न्यायालयाची गरज नाही. जबाबदारी कुठल्या सरकारची, हे स्पष्ट करा, असे म्हणत 16 जूनला कोल्हापूर येथे आंदोलन करणार आहे. पुणे ते मुंबई पायी लाँग मार्च काढला जाणार आहे, अशी माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी दिली.
हेही वाचा - ...म्हणून कोर्लईत गावबंदी केली - किरीट सोमैया
शिवराज्यभिषक सोहळ्यानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. याबाबत महाड येथे मराठा समाज समन्वयक आणि छत्रपती संभाजीराजे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. संभाजीराजे यांच्या भूमिकेला सरकार, लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
राजेंच्या भूमिकेला मराठा समाजाचा पाठिंबा
संभाजी राजेंच्या भुमीकेला मराठा समाजाचा एक मुखी पाठिंबा देण्यात आला आहे. मराठ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू रहाणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास होणाऱ्या आंदोलनाला सरकार जबाबदार राहील, अशी भूमिका घेण्यात आली आहे. कोरोनानंतर जी लाट येईल ती मराठ्यांची लाट. संभाजी राजेंवर कोणतीही वैयक्तिक टीका सहन करणार नाही. मराठा समाज त्यास चोख उत्तर देईल, हे आंदोलन गरीब मराठ्यांसाठी आहे. हे आंदोलन केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आहे, अशी भूमिका मराठा समाज समन्वयक यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
मागितलेल्या पाच मागण्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाची गरज नाही
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यानंतर राज्य शासनाकडे पाच मागण्या केल्या आहेत. सारथी, अण्णासाहेब महामंडळ, नियुक्त्या, नोकऱ्या याबाबत मागण्या केल्या आहेत. या मागण्या सरकारी स्तरावर सुटण्यासारख्या आहेत. यासाठी सर्वोच्च न्यायालयाचीही गरज नाही. जबाबदारी कुठल्या सरकारची, हे स्पष्ट करा, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
मी छत्रपती शिवाजी राजेंचा वंशज, कोणालाही वेठीस धरत नाही
कोरोनाच्या या काळात जनतेला वेठीस धरू नका, असे वक्तव्य शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केले. आम्ही कोणालाही वेठीस घरत नाही, वेठीस कोण धरत आहे हे जनतेला माहीत आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा वंशज आहे. अरविंद सावंत हे हुशार आहेत, ते माजी मंत्रीही आहेत, असे संभाजीराजे म्हणाले.
मेटेशी माझी तुलना का करता
मेटेशी माझी तुलना करू नका, तेही आरक्षणासाठी लढत आहेत, इतर नेतेही लढत आहेत. मला त्यात का ओढता, असे संभाजी राजे म्हणाले. तसेच, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे, त्यांना न्याय देणे हाच उद्देश आहे. यासाठी पक्ष काढण्याचा किंवा संघटना काढण्याचा विचार नाही. यात कोणतेही राजकारण नसून अराजकीय लढा आहे, असे संभाजी राजे म्हणाले.
उदयनराजेंना भेटणार
आम्ही दोघे राजे एकत्रित आहोत. समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही एकत्रित आहोत. दोघेही बेगमी आहोत. उदयनराजे यांची मी भेट घेणार आहे. मराठा आरक्षण मिळावे हाच आमचा उद्देश आहे, असे संभाजी राजे म्हणाले.
रायगड आणि शिवाजी महाराज कळायचे असेल तर रायगडवर पायी या
किल्ले रायगडवर अनेक नेते हे रोपवेने जात असतात. मात्र, रायगड किल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराज कळायचे असेल तर रोपवेने न जाता पायी गडावर या, तेव्हाच अवराज्याची आणि महाराजांची व्याप्ती कळेल, अशी टीकाही संभाजी राजे यांनी लोकप्रतिनिधींवर केली.
हेही वाचा - रायगड जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा