रायगड - पनवेलमधील खांदा कॉलनीत चक्क एक चारचाकी शोरूमच्या पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळली आहे. महामार्गाजवळ असलेल्या किया कंपनीच्या शोरूममध्ये संबंधित प्रकार घडला आहे. साडे नऊच्या सुमारास थेट काचा फोडून ही चारचाकी शोरूमच्या बाहेर कोसळली. मात्र, या चारचाकीचा चालक सुखरूप आहे.
खांदा कॉलनी परिसरात हायवेच्या शेजारीच एका कमर्शियल इमारतीत किया नामक कंपनीच्या चारचाकी गाड्यांचे शोरूम आहे. शोरूमच्या तळमजल्यावर कंपनीचे कार्यालय असून पहिल्या मजल्यावर या गाड्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.
महामार्गावरुन येणाऱ्या लोकांना किया कंपनीच्या आलिशान गाड्या दिसाव्यात यासाठी हायवेच्या दिशेने त्या उभ्या करण्यात आल्या आहेत.
दैनंदिन तपासणीसाठी सर्व चारचाकी चालू करत असताना अचानक चालकाचा ताबा सुटला; आणि चारचाकी थेट शोरूमच्या काचा फोडून बाहेर कोसळली. सिनेमात दाखवतात, असा प्रसंग खांदा कॉलनीत घडल्याने सर्व अचंबित झाले.
कार पहिल्या मजल्यावरून रस्त्यावर उभ्या असलेल्या इतर चारचाकींवर आदळल्याने इतर गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.