पनवेल - पनवेल मधून एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना अगदी विमानतळावर असल्याचा भास होईल, अशा पनवेल मधल्या पहिल्या-वहिल्या बसपोर्टच्या कामाला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. त्यामुळे या बसपोर्टची अवस्था 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न अशी झाली आहे.
विमानतळाच्या धर्तीवर राज्यात एसटी महामंडळाने नवीन ९ बसपोर्ट तयार करण्याचा निर्णय घेतला. यात विमानतळावर ज्या सुविधा मिळतात त्याच एसटीच्या प्रवाशांसाठी दिल्या जाणार आहेत. या प्रकल्पाच्या आराखड्यासाठी खासगी सल्लागार एजन्सी देखील नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारने केलेला घोषणेनंतर काही वर्षे लोटली तरी प्रवाशांच्या या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आल्याने सरकारची घोषणा ही घोषणाच राहते का? अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, पनवेलमधील प्रवासी वाहतूक संघ आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नुकताच या आगाराच्या नूतनीकरणाला सुरुवात झाली होती.
राज्यभरातून येणाऱ्या प्रवाशांसाठी तात्पुरत्या निवारा शेडसाठी पनवेल उड्डाणपुला शेजारील आगाराच्या जागेत निवारा शेड उभारण्यात येत होता. त्यासाठी वाहतुकीत बदल करावे लागत असल्याने या प्रक्रियेसाठी वाहतूक विभाग आणि पालिका प्रशासनाची परवानगी मिळाली नसल्याने हे काम पुन्हा बंद करण्यात आले. परवानगी मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. वाहतूक विभागाच्या परवानगीनंतर पालिकेच्या परवानगीने शेड उभारण्याचे काम केले जाणार, अशी प्रतिक्रिया एसटी विभागाचे अधिकारी महेश सावंत यांनी दिली. वाहतूक विभागाची कोणतीही हरकत नसेल तर पालिकाही या कामासाठी परवानगी देईल, असे पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख म्हणाले.