पनवेल - तळोजा एमआयडीसीतील जी. पी. ग्लोबल किमीत्सू नावाच्या कंपनीला आज भीषण आग लागली. प्रचंड पसरलेल्या या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून ही कंपनी बंद असल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
पनवेलमधील तळोजा एमआयडीसीमध्ये जी.पी. किमीत्सू प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. गेल्या चार महिन्यांपासून ही कंपनी बंद होती. मात्र, या कंपनीमध्ये प्रिंटिंगसाठीचा लागणार कच्चा माल साठवण्यात येत होता. या कंपनीचे उत्पादन जवळपास तीन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे कंपनीत कामगार वर्गही नव्हता. दुपारच्या सुमारास या कंपनीत शॉर्ट सर्किट झाले. या शॉर्टसर्किटमुळे कंपनीला लागलेली आग हळूहळू पसरून एकच भडका उडाला. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून एका तासात आग विझवण्यास यश मिळवले असल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी दिपक दोरागडे यांनी दिली.
ही कंपनी जरी बंद असली तरी या कंपनीत प्रिंटिंगसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची साठवण मोठ्या प्रमाणात केली होती. त्यामुळे आगीवर
नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. याबाबत सखोल चौकशी करून कारखाने अधिनियमाच्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य रायगड विभागाचे सहसंचालक मुकेश पाटील यांनी दिली.
चारच दिवसांपूर्वी अधिवेशनात उचलला होता मुद्दा
तळोजा एमआयडीसीमधील कंपनीत वारंवार लागणार्या आगीबाबत आणि कामगारांच्या सुरक्षेबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले होते. त्यांनतर घडलेल्या आजच्या घटनेने तळोजा एमआयडीसीमधील आगीच्या घटनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.