पनवेल - शाळेचा पहिला दिवस पहिल्यांदाच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुतुहलचा दिवस ठरतो. मात्र, कळंबोली परिसरात असलेल्या सुधागड हायस्कुल शेजारी असलेल्या मैदानावर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही वस्तू नक्की काय आहे? याची माहिती अद्याप मिळाली नाही. घटनास्थळी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) दाखल झाले असून त्यांनी तपास सुरु केला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबोलीमधल्या सुधागड हायस्कूलच्या बाजूला एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी आईस्क्रीम विक्रीच्या एका हातगाडीवर एक बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचे सुरक्षारक्षकाला समजले. त्याबरोबर या वस्तूला टायमर देखील लावला असल्याचे दिसून आले. थर्माकोल, प्लास्टिक आणि मेटल या वस्तूमध्ये टाकण्यात आल्याचे सुरक्षारक्षकाने सांगितले.
घटनेची माहिती मिळताच कळंबोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड घटनास्थळी दाखल झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलीस आणि बीडीडीएस दाखल झाल्यानंतर संबंधित संशयास्पद वस्तू त्यांनी ताब्यात घेतली असून त्याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.