रायगड - पेण आगारातून आपटा येथे जाणाऱ्या एसटी बसमध्ये (एमएच, १४ बीटी २७२४) बॉम्बसदृश्य वस्तू मिळाल्याने खळबळ उडाली. बॉम्ब स्कॉड पथक घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांना बॉम्ब सदृश्य वस्तू निकामी करण्यात यश आले आहे. यावेळी आपटा रस्त्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पेण आगारातून रात्री नऊच्या सुमारास आपटा येथे वस्तीला जाण्यासाठी बस निघाली. त्याचवेळी बस आपटा येथे आली असता बसमध्ये कोणाची तरी पिशवी राहिली असल्याचे वाहकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने ती उघडून पहिली असता, प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचे निर्दशनात आले. त्यामुळे वाहकाने याबाबत पोलिसांना पाचारण केले.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर अलिबाग येथून बॉम्ब स्कॉड पथकास पाचारण केले. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास बॉम्ब सदृश्य वस्तू निकामी करण्यात यश आले. मात्र, सापडलेली वस्तू ही बॉम्ब आहे की अजून काही याबाबत माहिती मिळालेली नाही. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर हे आज पत्रकार परिषद घेणार आहेत.