पेण (रायगड) - नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला आगरी समाजाचे दिवंगत नेते, भूमिपुत्र व लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी पेणचे भाजपा आमदार रविशेठ पाटील यांनी केली. त्यासाठी पेण येथे साखळी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पेणकरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला तीव्र विरोध केला.
भाजपा आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानापासून तहसील कार्यालयापर्यंत हे साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता.
'नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचेच नाव द्या'
'ज्या व्यक्तीने स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरता प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्यांच्या आंदोलन व प्रयत्नांमुळेच आज येथील शेतकऱ्यांना साडेबारा टक्के भूखंड मिळाला. अशा अहोरात्र कष्ट घेणाऱ्या व्यक्तीचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिलेच पाहिजे', अशी भूमिका रवीशेठ पाटील यांनी घेतली.
'नवी मुंबईसाठी दि.बा. पाटलांनी जीवन वेचले'
'नवी मुंबई उभारताना स्थानिक शेतकरी, प्रकल्पग्रस्त, मिठागर कामगार, आगरी जनता यांच्यासाठी दि. बा. पाटील यांनी आंदोलन करून न्याय मिळवून दिला. सामान्य जनतेसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. अशा झुंझार व लढवय्या नेत्याचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे. यासाठी हे साखळी आंदोलन करण्यात आले', अशी माहिती नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी यावेळी दिली.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात निवेदन दिले. याद्वारे त्यांनी शासनाकडे नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची मागणी केली.