रायगड - रायगडातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. दि. बा. पाटील यांच्या नावाच्या या मागणीसाठी 10 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग ते चरी, असा दहा ते बारा किलोमीटरपर्यंत मानवी साखळी जन आंदोलन केले जाणार आहे. यामध्ये सर्व पक्षानी सहभागी व्हावे, असे आवाहन रायगड दक्षिण भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी केले आहे.
रायगडातील होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत करणार असलेल्या साखळी आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी अलिबाग तुषार शासकीय विश्रामगृहात भाजपतर्फे पत्रकार परिषद आयोजित केली होती. दक्षिण जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी याबाबत माहिती दिली. भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे यावेळी उपस्थित होते.
रायगडातील आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण होण्याआधीच नामांतरवरून राजकारण
रायगड जिल्ह्यातील पनवेल परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ बनविण्याचे काम सुरू आहे. अद्याप प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नसली तरी या विमानतळाला लोकनेत्याची नावे देण्यावरून राजकारण सुरू झाले आहे. रायगडचे माजी खासदार दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याबाबत आग्रही भूमिका सर्व स्तरातून होत आहे. मात्र, आता शिवसेनेने दिवंगत बाळासाहेब ठाकरे, असे नाव देण्याबाबत भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे विमानतळ सुरू होण्यापूर्वीच नामांतरात लटकले आहे.
शिवसेनेकडून राजकारण - मोहिते
दि. बा. पाटील यांची नवी मुंबई ही कर्मभूमी आहे. नवी मुंबई उभारताना येथील शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्त, भूमिहीन जनता, ओबीसी जनता यांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंध आयुष्य वेचले आहे. अशा या नेत्याचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, अशी मागणी पूर्वीपासून होत आहे. मात्र, अचानक शिवसेनेने नावावरून राजकारण सुरू केले असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
10 जून रोजी करणार मानवी साखळी आंदोलन
दि. वा. पाटील यांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे यासाठी अलिबाग जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सकाळी 10 वाजता साखळी आंदोलनाला सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते शेतकरी संप झालेल्या चरी गावपर्यत ही मानवी साखळी तयार केली जाणार आहे. कोरोनाच्या नियमाचे पालन करून हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाला सर्व पक्षानी यावे, असे आवाहन ही पत्रकार परिषदेत अॅड. महेश मोहिते यांनी केले आहे.
हेही वाचा - अलिबाग जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला धक्काबुक्की; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल