रायगड - जिल्ह्यातील समुद्र किनारी असलेल्या जलदुर्गापैकी एक असलेल्या किल्ले कासावर (पद्मदुर्ग) देशातील सर्वात मोठा भगवा ध्वज फडकवण्यात आला आहे. हा ध्वज कायम स्वरूपी राहणार असून यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानकडून प्रयत्न करण्यात आले होते. विशेष म्हणजे गुरुवारी कंकणाकृती सूर्य ग्रहण असतानाही सह्याद्री प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी किल्ले पद्मदुर्गावर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आणि स्वराज्याचे भगवे निशाणा आसमंतात फडकवले.
हेही वाचा - 'कोल्हापूरकरांनो, लक्षात ठेवा तुमचा फोन यमालाही लागू शकतो'
सह्याद्री प्रतिष्ठानकडून मिशन जंजीरा या मोहिमेअंतर्गत किल्ले पद्मदुर्गावर दुर्गसेवकांनी तब्बल ८० फुट उंचीचा हा ध्वज फडकवला. नाविक दल आणि पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या या किल्ल्याकडे पर्यटकांचे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे या ध्वजाकडे पाहून पर्यटक या किल्ल्याकडे वळतील, असा विश्वास सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रमुख दुर्गसेवक श्रमिक गोजमगुंडे यांनी दिली. यावेळी शेकडो दुर्गसेवकांनी गडावर उपस्थितीत लावली होती.
समुद्र तटावरून वाहणाऱ्या पुडं वाऱ्याला थपडा मारत हा भगवा ध्वज डौलाने फडकत होता. हे दृश्य पाहून यावेळी अनेकांची छाती अभिमानाने फुलून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. यापूर्वी गडावर ध्वज फडकवण्यास पुरातत्व विभागाने विरोध दर्शवला होता. मात्र मावळ्यांचा हा संकल्प गुरुवारी पूर्ण झाला. तसेच या गडावर तोफगाडेही बसविण्यात येणार आहेत.
किल्ले पद्मदुर्गाला कासा किल्ला या नावाने ही ओळखले जाते. कासा हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेला मध्ययुगीन जलदुर्ग आहे. मराठा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला मुरूड गावाजवळील समुद्रात आहे. मुरूड रायगड जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव आहे. मुरूडजवळ जंजिरा व सामराजगड असे इतर किल्ले आहेत.
जवळ असलेल्या जंजिरा किल्ल्याच्या सहाय्याने सिद्दी अतिशय प्रबळ झाले. त्यांच्या आरमारी सामर्थ्याने त्यांनी किनारपट्टीवर दरारा निर्माण केला. सिद्द्यांच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी शिवाजीराजांनी मुरूडच्या समुद्रातल्या कासवाच्या आकाराच्या बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा जलदुर्ग बांधला. त्याबद्दल महाराजांनी उद्गार काढले, "पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापुरी उभी केली आहे. कासा किल्ल्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्दीला चांगलाच पायबंद बसला.".