रायगड - कोरोना रोखण्यासाठी त्रिसूस्त्री नियम शासनाने तयार केले आहेत. मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि हात स्वच्छ धुणे या तीन नियमाचे पालन करणे महत्वाचे आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटनास येत असलेल्या पर्यटकांनी मात्र या नियमांना हरताळ फासला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. समुद्रकिनारी पर्यटनास येणारे पर्यटक, स्थानिक व्यवसायिक, नागरिक हे मास्कचा वापर न करता सर्रास विनामास्क फिरताना दिसत आहेत. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्या पर्यटक, नागरिक यांच्यामुळे कोरोनाचा पुन्हा प्रसार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलणे गरजेचे आहे.
रायगड जिल्हा हा आता हळूहळू कोरोनामुक्तीकडे जाण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने टाळेबंदीत शिथिलता दिल्यानंतर सर्व व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. पर्यटनही सुरू झाल्याने सात आठ महिन्यानंतर जिल्ह्यात पर्यटकांचा राबता सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्रकिनारेही पर्यटकांनी बहरू लागली आहेत.
पर्यटक सलग सुट्टी लागली की जिल्ह्यात दाखल होतात. समुद्रकिनारी येऊन समुद्रस्नानाचा, घोडा, उंट, केटीव्ही सफारीचा आनंद लुटत आहेत. पर्यटक पुन्हा जिल्ह्यात आल्याने समुद्रकिनारी असलेले छोटे व्यवसायिक, हॉटेल, लॉजिग, रिसॉर्ट यांचाही आर्थिक फायदा होऊ लागला आहे. पर्यटन सुरू करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आखून दिलेल्या नियमाचे पर्यटक, स्थानिक व्यवसायिक यांनी नियम पाळणे गरजेचे आहे. मात्र पर्यटकांकडून नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.
पर्यटक, स्थानिक व्यावसायिकांना मास्कचे वावगे
मास्क लावणे हे कोरोना काळात गरजेचे असताना येणारे पर्यटक हे मास्क न लावताच समुद्र किनारी रपेट मारीत आहेत. त्यातच स्थानिक व्यवसायिक असलेले घोडे, उंट, केटीव्ही व्यवसायिकही स्वतः मास्क न लावता पर्यटकांना सुविधा देत आहेत. स्थानिक प्रशासन, पोलीस हे सुद्धा डोळे बंद करून कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत.
नागरिकांवर कारवाई, पर्यटकाकडे मात्र दुर्लक्ष
जिल्ह्यात शहरात नाक्यांनाक्यावर मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर स्थानिक प्रशासन, पोलिसांकडून कारवाई केली जाते. त्याच्याकडून दंडही आकाराला जातो. मग पर्यटकांना ही सूट का असा सवालही आता निर्माण झाला आहे. पर्यटक येत असल्याने स्थानिकांना व्यवसाय मिळत आहे. असे असले तरी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे हेही तितकेच महत्वाचे आहे. अन्यथा पुन्हा रायगडात कोरोनाची दुसरी लाट येण्यास उशीर लागणार नाही.