रायगड - किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. शिवभक्तांना आता थेट तख्तावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेता येणार आहे. महाराजांसमोर नतमस्तक होता येणार आहे. तख्ताकडे जाणारे बॅरिकेट्स आता हटवण्यात आले आहेत. यामुळे शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेली अनेक वर्षे शिवभक्त आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात बॅरीकेडसचा अडथळा होता. हा अडथळा आता दूर झाला आहे.
जागेचे पावित्र्य राखा
रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी मंगळवारी किल्ले रायगडला भेट दिली. तेथील अधिकाऱ्याशी चर्चा करून हे बॅरीकेटस हटवून मेघडंबरीच्या जवळ उभारण्यात आले आहेत. लवकरच या ठिकाणी ऐतिहासिक पद्धतीचे बॅरीकेटस उभारले जाणार आहेत. मात्र महाराजांचे जवळून दर्शन घेताना जागेचे पावित्र्य राखले जावे, सेल्फी काढू नये, शिवपुतळ्याकडे पाठ करून उभे राहू नये, अशी अपेक्षा खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.