रायगड - 28 जानेवारी (गुरुवार) मध्यरात्री मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पिस्तुल दाखवून वाहतुकीतून मार्ग काढणाऱ्या त्या आरोपींना रविवारी खोपोली पोलिसांनी खालापूर कोर्टात हजर केले. यावेळी न्यायालयाने या आरोपींना जामीन मंजूर केला. या प्रकरणात आरोपींकडे परवाना असल्याचे पिस्तूल व दुसऱ्याकडे लायटर असल्याचे समोर आले असून शिवसेनेशीही काही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
28 जानेवारीला मध्यरात्री मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर कारचालक आणि त्यातील अन्य जणांनी पिस्तूल दाखवत ट्राफिकमधून रस्ता काढत निघत आहेत, असा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला होता. या संदर्भात खोपोली पोलीस पोलिसांनी आर्म अॅक्ट 325 नुसार गुन्हा दाखल केला होता. हा व्हिडिओ एम.आय.एम.चे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन शेअर केला व त्यांनी या संदर्भात थेट शिवसेनेवर आरोप करीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे या प्रकरणात नक्की काय आहे, याकडे साऱ्यांचे लक्ष लागल्याने या तरुणांचा हेतू तरी काय होता, असा प्रश्न पडला असताना खोपोली पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भात जलत तपासाची चक्रे फिरवली व शनिवारी खोपोली पोलिसांनी या कारचा पर्दाफाश करून कराड- कोल्हापूर दरम्यान कार व त्यामधून प्रवास करणारे विकास गजानन कांबळे (रा.मालाड वय 31) व विजय प्रकाश सीताराम मिश्रा (रा.सांताक्रूझ इस्ट, वय 51) यांना ताब्यात घेतले होते.
रविवारी सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालसंग, पोलीस कर्मचारी भालेराव, खरात, पाटील यांनी या दोन्ही आरोपींना खालापूर न्यालायात आणले. आरोपीच्या वतीने अँड बोरडे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने या आरोपींकडे रिव्हॉल्वर बाळगण्याचा परवाना असल्याने व अन्य कागदपत्रे असल्याने जामीन मंजूर केला आहे. मात्र या प्रकरणात शिवसेनेचा कोणताही संबध नसल्याचे समोर आले आहे.