रायगड - जिल्ह्यातील गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहचलेला आहे. वर्षभर ज्याची प्रतिक्षा केली जाते. त्या लाडक्या बाप्पांचे आज मोठ्या उत्साहात आगमन झाल्याने घराघरात मंगळमय वातावरण निर्माण झाले आहे. जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर व्हावे अशी प्रार्थना सर्व गणेशभक्तांनी गणरायाकडे केली आहे.
लाखो चाकरमानी गणेश भक्त आपल्या गणरायाच्या स्वागतासाठी गावातील घरी पोहचले आहेत. आज पहाटेपासून अत्यंत साध्या पद्धतीने परंतु तितक्याच भक्तिभावाने बाप्पांचे स्वागत करण्यात आले. वाजत गाजत न येता शांततेत गणरायाचे आगमन झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अनेकांनी पुजाऱ्यांविना टेप लावून तर काहींनी ऑनलाइन गणरायाची स्थापना पूजा केली.
घराघरात मंत्रपुष्पांच्या जयघोषात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. कोरोनाचे संकट असतानाही जिल्ह्यात तब्बल १ लाख २०३९ घरगुती तर 287 सार्वजनिक गणेशाची स्थापना केली जाणार आहे. कोरोनाचे संकट असले तरी गणेशभक्तांनी जय्यत तयारी केलेली आहे. सुबक आरास बनविले आहेत. तर अनेकांनी पर्यावरणपूरक गणरायाची स्थापना केली आहे. सण उत्साहात साजरा व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली असून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. एकंदरीत कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी जिल्ह्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरू झाला आहे.