रायगड - अलिबाग समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यात आता भर पडणार आहे. अलिबाग समुद्रकिनार्यावर 37 टन वजनाचा भव्य रणगाडा बसविण्यात येणार आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकरी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अलिबाग हे पर्यटन स्थळ आहे. अलिबागला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. त्याचबरोबर समुद्रात कुलाबा किल्ला असल्याने त्याने सौंदर्यात भर पडली आहे. अलिबागचे निसर्ग सौंदर्य, समुद्र किनारी मौज-मजा करण्यासाठी आणि कुलाबा किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी अलिबामध्ये येत असतात. तसेच समुद्रस्नानाचा आनंद लुटतात. किल्ला वगळता सुमद्रकिनार्यावर पाहण्यासरखे काही नाही. परंतु, लवकरच अलिबागच्या समुद्रकिनार्यावर वॉर ट्रॉफी म्हणून बोलला जाणारा रणगाडा तोफ बसवण्यात येणार आहे. हा रणगाडा पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल.
रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अलिबाग समुद्र किनारी रणगाडा बसविण्याबाबत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री मंत्रालयाशी संपर्क केला होता. युद्धात उपयोगी पडलेली वॉर ट्रॉफी रणगाडा तोफ रायगडसाठी द्यावी, अशी विनंती पत्राद्वारे केली होती. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मागणीनुसार संरक्षण राज्यमंत्रालयाने मागणी मान्य केली आहे. याबाबतचे पत्र राज्यमंत्री संरक्षण मंत्रालयाने रायगड जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे.
रणगाडा तोफ लावण्यास केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. टीकेटी 55 प्रकारचा हा रणगाडा आहे. त्याची लांबी 28 फूट असून रूंदी 12 फुट आहे. या तोफेचे वजन 37 टन आहे. सध्या हा रणगाडा पुण्यात आहे. रणगाडा बसवण्यासाठी अलिबाग समुद्रकिनार्यावर असलेल्या विरंगुळा बागेच्या बाहेर चौथरा बांधण्यात येईल. चौथरा बांधून पूर्ण झाल्यावर तोफ आलिबागमध्ये आणली जाईल. पुढील महिन्यात ही तोफ आलिबाग समुद्रकिनार्यावर लावली जाईल. या रणगाडा पाहिल्यानंतर रायगडातील तरुणांमध्ये सैन्यात भरती होण्याची चेतना निर्माण होईल, असेही डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सांगितले.