रायगड - खोपोली शहरात कोरोनाबाधितांचा आकडा एक आकडी आला असला तरी जिल्ह्यातील परिस्थिती पाहता पुन्हा संक्रमण पसरू नये यासाठी खोपोली पोलीस आणि खोपोली नगरपालिका प्रशासन यांनी बुधवारी सकाळी विनाकारण फिरणारे तसेच बाजारहाटीसाठी आलेल्यांची पोलिस ठाण्याच्या समोरच कोरोना टेस्ट केली. प्रशासनाने २४ जणांची अँटीजेन चाचणी केली असता यामध्ये सुदैवाने एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.
विनाकारण फिरणाऱ्यांना बसणार चाप -
खोपोली हे पुणे, मुंबई महानगराच्या मध्यवर्ती शहर असून तालुक्यातील मोठी बाजारपेठ असल्यामुळे दररोज अनेक लोकांची वर्दळ शहरात असते. त्यामुळे कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत दररोज कोरोनाबाधितांचा आकडा ६० च्या वर होता. तसेच मृतांचा वाढता आकडा चिंतेचा विषय असताना मागील आठ दिवसापासून कोरोनाबाधितांचा आकडा एक आकडी आला असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. परंतु बाजारपेठेत वाढती गर्दी पाहता बाधितांचा आकडा वाढू नये तसेच विनाकारण फिरणाऱ्यांंवर अंकुश बसावा यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या आदेशाने तसेच पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली विनाकारण फिरणारे तसेच बाजारहाटीसाठी आलेल्यांची पोलिस ठाण्याच्या समोरच अँटीजेन चाचणी केली.
यावेळी खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक धनाजी क्षिरसागर, सहाय्यक पोलिस निरिक्षक सतीश आसवर, गोपीनीय विभागाचे कृष्णा गडदे, पोलिस नाईक प्रदिप कुंभार, सामाजिक कार्यकर्ते गुरूनाथ साटेलकर तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयातील अमोल, समीर लिमये, पालिका कर्मचारी गुणाजी गायकवाड, विजय वाघमारे, विठोबा म्हात्रे, अनिल इंगळे, प्रदिप गायकवाड आदी कर्मचारी उपस्थित होते.