रायगड - जिल्ह्यात कर्जत तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण हे इतर तालुक्यांपेक्षा जास्त आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू असून शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्याही बंद करण्यात आल्या आहेत. अंगणवाड्या बंद असल्याने स्तनदा माता, गरोदर माता आणि कुपोषित बालकांना अमृत आहार पोहोचवणे जिकरीचे झाले होते. मात्र, यावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील स्तनदा माता आणि कुपोषित बालकांना घरपोच डॉ. अब्दुल कलाम अमृत पोषण आहार पोहोचवत आहेत. कोरोना संकटकाळात कोरोना योद्धा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याचे काम समाजापुढे प्रेरणादायी ठरत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्व शाळा, अंगणवाड्या बंद केल्या आहेत. कर्जत तालुक्यातील 330 अंगणवाड्या बंद झाल्या आहेत, असे असले तरी आदिवासी भागात 135 अंगणवाड्या आहेत. याठिकाणी आदिवासी भागातील कुपोषित बालके, स्तनदा, गरोदर माता यांना पोषण आहार दिला जातो. मात्र, संचारबंदी काळात या स्तनदा, गरोदर माता आणि कुपोषित बालकांना आहार देणे कठीण झाले होते. या भागात कुपोषण जास्त असल्याने शासनाने अतिरिक्त आहार देण्याचे ठरविले. त्यानुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या स्तनदा माता, गरोदर माता यांना धान्याच्या स्वरुपात सकस आहार, तर कुपोषित बालकांना शिजवलेला पोषण आहार, अंडी आणि केळी याचे वाटप घरोघरी जाऊन करत आहेत. त्यामुळे कोरोनासारखे संकट असताना आज कर्जत तालुक्यातील कुपोषित बालके, स्तनदा माता, गरोदर माता यांना सकस आणि पोषण आहार मिळत आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस या कोरोना संकटकाळात कोरोनयोद्धा म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहेत.