मुंबई - ब्रिटीशकालीन 190 वर्षे जुन्या अमृतांजन पुलाला पाडण्याला अखेर सुरुवात झाली आहे. आज (रविवार) पुलावर पहिला हातोडा टाकण्यात आला असून रात्रीपर्यंत संपूर्ण पुल भुईसपाट होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) सहव्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी) अनिलकुमार गायकवाड यांनी दिली आहे. तर या पुलाच्या पाडण्याच्या एकंजरीत कामात अंदाजे 1200 ट्रक मलबा निघेल आणि तो काढण्याच्या कामाला उद्या (सोमवारी) सुरुवात होईल असेही ते म्हणाले.
हेही वाचा... जम्मू-काश्मीर : गेल्या 24 तासांत 9 दहशतवाद्यांना कंठस्नान, 1 जवान हुतात्मा
महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे आता सध्या यामार्गावर हा पूल पाडल्यामुळे 2 मार्गिका वाढणार आहेत. (एक येण्यासाठी आणि जाण्यासाठी एक) त्यामुळे आता द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी दूर होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
2017 पासून हा पूल पडण्यासाठी एमएसआरडीसी प्रयत्नशील होते. मात्र, पूल पाडण्यास होणाऱ्या विरोध असल्यामुळे त्यांना काही करता येत नव्हते. आता लॉकडाऊनच्या संधीचा फायदा घेत या कामास सुरूवात करण्यात आली आहे. 16 मीटर लांबीचे आणि 2 तसेच 3 मीटर रुंदीचे पिलर नियंत्रित स्फोटके लावून पडण्यात येत आहेत. स्फोटके लावण्याची तयारी सुरू असून रात्री उशीरा पूल स्फोटाने ढासळेल. त्यानंतर मलबा काढत जागा मोकळी करण्यात येणार आहे. यातून अंदाजे 1200 ट्रक मलबा निघणार असून तो एमएसआरडीसीच्या डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येणार आहे.
हेही वाचा... 'तबलिगी जमात'बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे एकाची हत्या..
मलबा काढल्यानंतर रस्ता रुंद करण्यात येणार आहे. पूल तोडल्याने 2 लेन साठी जागा होणार आहे. त्यामुळे आता येथील वाहतूक कोंडी सुटणार असून येथील अपघात थांबतील. असे गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात हे काम होत असल्याने कामगार-अधिकाऱ्यांची योग्य काळजी घेत सोशल डिस्टन्सिंग पाळत हे काम केले जात असल्याचेही ते म्हणाले. येत्या 14 एप्रिलपर्यंत हे काम चालणार आहे.