रायगड : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा घाटातील ब्रिटिशकालीन अमृतांजन पुल लवकरच इतिहास जमा होणार आहे. येत्या 4 ते 14 एप्रिल दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा पुल पाडण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ब्रिटिशकालीन अमृतांजन पुल आहे. या पुलाच्या खालून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जातो. पुलामुळे मार्गावर वळण आले असून रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे याठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. मागील काही महिन्यांपासून हा पुल पाडण्यासाठी हालचाली सुरू होत्या. मात्र, द्रुतगती मार्गावरील प्रचंड वाहतुकीमुळे ते शक्य होत नव्हते.
हेही वाचा - राज्यात कोरोना बाधित ८८ नवीन रुग्णांची नोंद; ४२ रुग्णांना घरी सोडले
सध्या देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील वाहतुक मंदावली आहे. येत्या 4 ते 14 एप्रिल दरम्यान हा पुल पाडण्यात निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रायगडच्या जिल्हाधिकाऱयांना कल्पना देऊन परवानगी घेतली आहे. नियंत्रीत स्फोटकांचा वापर करुन हा पुल पाडण्यात येणार आहे.
या कालावधी दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक अंडा पाँईट येथून खंडाळा आणि लोणावळा शहरातून बाहेर काढण्यात येणार आहे. तर मुंबईच्या दिशेकडे जाणारी वाहतूक लोणावळा एक्झिट येथून खाली उतरवत लोणावळा आणि खंडाळा शहरातून अंडा पाँईट येथे द्रुतगती मार्गाला जोडण्यात येणार आहे. अशा प्रकारे द्रुतगती मार्गावरील दहा किमी अंतराची वाहतूक वळवण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.