पुणे - शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी आघाडी आणि युतीचे दिग्गज नेते उपस्थित होते. अर्ज भरताना दोन्हींही उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ नरपतगिरी चौकात जाहीर सभा झाली. त्यानंतर आढळराव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे अर्ज जमा केला.
यावेळी पुण्याचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट, भोसरीचे आमदार महेश लांडगे, आमदार योगेश टिळेकर, राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेनेच्या उपनेत्या निलम गोऱ्हे आणि शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे उपस्थित होते.
आघाडीचे उमेदवार कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना-आणि रिपाइं (कवाडे गट) आणि मित्र पक्ष आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील इस्कॉन मंदिर येथे आघाडीच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी अजित पवार, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.