रायगड - केस कापण्याचा व्यवसाय म्हटले की, अनेक तरुण याकडे हीन भावनेने पाहतात. त्यामुळे बरेचसे तरुण या व्यवसायाकडे वळत नाहीत. मात्र, अलिबागच्या अमित वैद्य या तरुणाने याच व्यवसायातून विश्व निर्माण केले आहे. मुंबईतील गोरेगाव येथे ऑल इंडिया स्तरावर 'हेअर अँड बुटी शो इंडिया' ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अमित वैद्यने गोल्ड मेडल मिळविले आहे. त्याच्या यशाने अलिबागसह रायगडचे नाव उज्वल झाले आहे.
मुंबईत ८ आणि ९ एप्रिलला ही स्पर्धा आयोजित केली होती. विविध हेअर स्टाईल असलेल्या स्पर्धेत ३५० स्पर्धक सहभागी झाले होते. अमितने 'आवंड गार्ड हेअर स्टाईल' या स्पर्धेत आपल्या सहकार्यासोबत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्याला प्रथम क्रमांकाचे गोल्ड मेडल आणि ट्रॉफी, असा पुरस्कार प्राप्त झाला आहे. आतापर्यत त्याने देशात झालेल्या 'एशिया कप', 'आयवा ट्रॉफी', या हेअर अँड ब्युटी स्पर्धेतील १२ स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन गोल्ड मेडल मिळविले आहे. आज अमित वैद्यने फॅशन आणि ब्युटी जगतात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कोरले आहे.
कोण आहे अमित वैद्य
अमित हा अलिबाग शहरात राहणारा उच्च शिक्षित तरुण आहे. त्याने केस कापण्याचा व्यवसाय करण्याचा निर्धार केला. यासाठी त्याने लंडन येथे जाऊन प्रशिक्षण घेतले. त्यानंतर अलिबागमध्ये परतून 'पॅशन अँड ब्यूटी' नावाने सलून सुरु केले. हळू हळू त्याने या व्यवसायात आपला जम बसवला. आज त्याने या व्यवसायातुन आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अमितला यासाठी त्याचे आई, वडील आणि पत्नीचे सहकार्य मिळाले. अनेक फॅशन शो, ब्युटी स्पर्धा यामध्ये अमितला ज्युरी म्हणून बोलावले जाते. त्याने स्वत:ची अकॅडमीदेखील सुरू केली आहे. या व्यवसायात सलून, फिल्म इंडस्ट्री, फॅशन शो, मेकअप आर्टिस्ट, ब्युटीशीयन्स, मेडिकल इंडस्ट्री यामध्ये तरुण, तरुणीना रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या अनेक संधी आहेत, असे अमितने सांगितले आहे. या व्यवसायाकडे पालकांनीही वेगळ्या दृष्टीने बघावे, असेही तो यावेळी म्हणाला.