अलिबाग (रायगड) - तालुक्यात मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत होण्यापूर्वी पहिली बॅच 2021 सालात सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार सोमवारी (दि. 30 नोव्हेंबर) पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आरसीएफ शाळा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयांची पाहणी केली. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयासाठीही दहा ते बारा एकर जागेची तरतूद केली जाणार असून तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहेत. अलिबाग हे मेडिकल हब बनविणार असल्याचेही पालकमंत्री तटकरे यांनी सांगितले.
अलिबाग तालुक्यात उसर याठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासनाने मंजूर केले आहे. यासाठी 52 एकर जागा प्रस्तावित केली आहे. यामध्ये 30 एकर जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तर उर्वरित जागेवर आयुर्वेदिक महाविद्यालय, नर्सिग कॉलेज करण्याचा मानस आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत होण्यापूर्वी 2021 साली वैद्यकीय विद्यार्थ्यांची पहिली बॅच सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने अलिबाग आरसीएफ कॉलनीमधील सभागृहात विद्यार्थी यांचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने सोमवारी (दि. 30 नोव्हेंबर) पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पाहणी केली. यावेळी आरसीएफ अधिकारी याच्याशी चर्चा करून मंत्रालय स्तरावर केंद्राची मंजुरी घेतली जाणार असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालयांची पाहणी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्रांचीही मंजुरी मिळाली असून केंद्रीय पथक हे जिल्हा सामान्य रुगणलायत पाहणी करण्यासाठी येणार आहे. त्याआधी जिल्हा सामान्य रुगणलायत सर्व तयार पूर्ण करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी करून कामाबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने, वैद्यकीय अधिकारी, बांधकाम अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा सामान्य रुग्णालय, डॉक्टर्स इमारतिचेही करणार नूतनीकरण
जिल्हा सामान्य रुग्णालयांची इमारत ही 40 वर्षे जुनी झाली असून डॉक्टर्स इमारत ही जीर्ण झाली आहे. ततामुळे या दोन्ही इमारती नव्याने बांधण्याबाबत पत्रकारांनी पालकमंत्री याना प्रश्न उपस्थित केला. याबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयासाठीही दहा ते बारा एकर जागा लागणार असून त्यादृष्टीने जागा उपलब्ध करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच डॉक्टर्स इमारतीचेही नूतनीकरण केले जाणार असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
अलिबाग होणार मेडिकल हब
अलिबाग तालुक्यात उसर याठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे. यासाठी 52 एकर जागा प्रस्तावित केली आहे. 30 एकर जागेवर वैद्यकीय महाविद्यालय इमारत उभारण्यात येणार आहे. तर उर्वरित जागेवर आयुर्वेदिक महाविद्यालय आणि नर्सिंग विद्यालय, महिलांचे रुग्णालय सुरू केले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात अलिबाग तालुका हा मेडिकल हब म्हणून नावारुपाला येणार असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
हेही वाचा - मुंबई-पुणे महामार्गावर दोन अपघात; चार जण जखमी