रायगड - अलिबाग तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर तहसीलदार, अलिबाग नगरपालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून कारवाई सुरू झाली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये केलेल्या कारवाईत पन्नास हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे. अलिबाग तालुक्यात कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर उभारण्यात आले असून काही रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहे, अशी माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.
रायगड जिल्ह्यात सध्या दररोज चारशेहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. असे असले तरी अनेक नागरिक कोरोना सुरक्षा उपाययोजनांना गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. कोरोना प्रादुर्भवापासून वाचण्यासाठी चेहऱ्यावर मास्क लावणे, बंधनकारक आहे. माक्ष, अनेकजण मास्क न लावता बिनधास्त बाजारात फिरत आहेत. मास्क न लावणाऱ्या आणि नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर आता कारवाईचा बडगा अलिबाग प्रशासनाने उचलला आहे.
अलिबाग शहरातील एसटी स्टँड परिसरात अलिबाग नगरपालिका, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने नाकाबंदी केली आहे. मास्क न लावलेल्या नागरिकांकडून 500 रुपये दंड वसुली केली जात आहे. अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ, पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी बाजारपेठ, मासळी बाजार, भाजी मार्केटमध्ये फिरून मास्क न वापरणाऱ्या दुकानदार व नागरिकांवर कारवाई केली. प्रत्येक नागरिकांने घराबाहेर पडताना मास्क वापरावे, असे आवाहन तहसीलदार सचिन शेजाळ यांनी केले आहे.