रायगड - निसर्ग चक्रीवादळाने आंबा, काजू, नारळ, सुपारी तसेच अंतर्गत मसाले या बागांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांना पुढील 5 ते 7 वर्ष पिक उत्पन्न मिळणार नाही. रायगड जिल्ह्यात साधारण 22 हजार हेक्टर फळबाग शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या बागायतदार शेतकऱ्यांचे पंचनामे हे आठवड्यात पूर्ण करण्यात येणार येतील. रायगडसह कोकणात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना यावेळी नियमाच्या पलीकडे जाऊन मदत दिली जाणार असल्याचा कॅबिनेट बैठकीत निर्णय झाला आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी, नागरिक यांच्या पाठिशी सरकार ठामपणे उभा असून, पुन्हा त्याला उभे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रायगड जिल्ह्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि आढावा बैठकीसाठी कृषीमंत्री दादा भुसे यांनी आज (बुधुवार) जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी पेण, रोहा, मुरुड, चौल रेवदंडा या नुकसानग्रस्त भागात भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर राजस्व सभागृहात दादा भुसे यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, राजीप मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, आमदार महेंद्र दळवी, रायगड जि.प. विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा कृषी अधिकारी पांडुरंग शेळके उपस्थित होते.
![Agriculture Minister Dada Bhuse Review of the damaged area in raigad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-rai-03-dadabhisepc-7203760_10062020202516_1006f_1591800916_344.jpg)
निसर्ग चक्रीवादळात बागायतदार हा पूर्णतः कोलमडला आहे. त्यादृष्टीने या बागायतदार शेतकऱ्याला पुन्हा उभारी देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. आंबा झाडाला पुन्हा जिवंत करण्यासाठी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाकडून प्रयत्न करणार आहे. यासाठी कृषी विद्यापीठाचे पथक दोन दिवसात जिल्ह्यात दाखल होणार असल्याचे भुसे म्हणाले. नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांची पडलेली झाडे काढण्यासाठी कटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच नुकसान झालेल्या बागायतीमध्ये काम करणाऱ्यांना रोजगार हमीतून रक्कम दिली जाणार आहे. तसेच कोकणातील बागा तयार करण्यासाठी पुढील 5 वर्षासाठी योजना तयार करणार असल्याचेही भुसे म्हणाले.
![Agriculture Minister Dada Bhuse Review of the damaged area in raigad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-rai-03-dadabhisepc-7203760_10062020202516_1006f_1591800916_343.jpg)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती झालेल्या कॅबिनेट बैठकीत नुकसानग्रस्तांना नियम बदलून नुकसान भरपाई दिली जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री २ दिवसात घोषणा करतील अशी माहिती दादा भुसे यांनी दिली. वादळानंतर नागरिकांनी रस्त्यावर पडलेली झाडे उचलण्यासाठी, पोल बाजूला करण्यासाठी तसेच उभे करण्यासाठी लोकसहभाग घेऊन पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचेही दादा भुसे यांनी आभार मानले.
![Agriculture Minister Dada Bhuse Review of the damaged area in raigad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-rai-03-dadabhisepc-7203760_10062020202516_1006f_1591800916_105.jpg)