रायगड - उरण तालुक्यामध्ये मानवी साखळी तयार करून, आंदोलन करण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध करत दि.बा. पाटील यांच्या नावासाठी वाद सुरू आहे. राज्यशासन बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही असून, स्थानिक भूमीपुत्रांनी या निर्णयाला विरोध केला आहे.
१३ की.मी. मानवी साखळी करून आंदोलन-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाचा वाद उफाळून आला आहे. उरण, पनवेल, नवी मुंबई येथील स्थानिक भूमीपुत्रांचा विमानतळाला सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा राज्यशासनाने घेतलेल्या निर्णयाला विरोध आहे. येथील स्थानिक भूमिपुत्रांनी या नामकरणाला विरोध करून, सिडको आंदोलनातुन संपूर्ण देशाला न्याय देणारे दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. मात्र राज्यशासनाकडून याबाबत कोणताही ठाम निर्णय घेतला जात नसल्याने गुरुवारी सकाळी 9 वाजल्यापासून 13 कि.मी. मानवी साखळी तयार करून, वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले आहे. या आंदोलनात हजारो भूमिपुत्रांना सहभाग घेत आपल्या मागण्या मांडल्या आहेत.
एकंदरीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध करत दि.बा.पाटील यांच्या नावाचा आग्रह धरणार्यानी मानवी साखळी तयार करत आंदोलन केले असून, शोषल मीडियाच्या माध्यमातूनही हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात आल्याचे दिसून आले. स्टेटस आणि पोस्टच्या माध्यमातून विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात यावे असे फलक वायरल करून, आंदोलनाचा प्रसार करण्यात आला होता. या पोस्टच्या माध्यमातून आंदोलनाची जमवाजमवी करण्यास अधिकच मदत झाली आहे.