रायगड - 'कुणी घर देता का घर' नटसम्राट नाटकातील हा संवाद, या संवादासारखी काहीशी परिस्थिती अलिबाग तालुक्यातील बोडणीकरांची झाली आहे. फरक आहे घरा ऐवजी पाण्याचा. गेली तीस वर्षे बोडणीकरांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. रेवस पाणी पुरवठा योजना असूनही बोडणीकरांना 'कुणी पाणी देता का पाणी' अशी ओरड आजही करावी लागत आहे. पाणी प्रश्न सुटत नसल्याने अखेर बोडणीकर शनिवारी 20 मार्च रोजी हंडा मोर्चा काढून दस्तुरी फाट्यावर आंदोलन करून रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची वाट अडवणार आहेत. त्यामुळे या हंडा मोर्च्यानंतर तरी बोडणीकरांचा पाणी प्रश्न जिल्हा परिषद प्रशासन सोडविणार का? याकडे लक्ष लागले आहे.
पाण्यासाठी रात्रीची धावाधाव
गावातील महिला ह्या मासळी विकण्याचा व्यवसाय करीत आहेत. सकाळी लवकर उठून घरातील पाण्याचा प्रश्न सोडवून त्यानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी मासे विकण्यास जातात. येताना ज्या ठिकाणी मासे विक्रीस गेल्या आहेत त्याठिकाणाहून पाण्याचा भरलेला ड्रम घेऊन येतात. दुपारी घरी आल्यानंतर मासळी सुखविण्यासाठी बंदरावर जाऊन रात्रीच्या जेवणाची खटपट करून पुन्हा रात्री पाण्याच्या शोधात लहान मुलांना घरात ठेवून जावे लागत आहे, अशी कष्टदायी कहाणी चंद्रा कोळी, द्रौपदी कोळी, मालसा कोळी, कलावती कोळी या महिलांनी सांगितली.
गावात पाणी नसल्याने मुलांना लग्नासाठी मिळत नाहीत मुली
बोडणी गावात पाण्याचे दुर्भिक्षम असल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्याची समस्या गावात असल्याने मुलांना लग्नासाठी कोणी मुलगीही मिळत नसल्याची खंत कोळी महिलांनी बोलून दाखवली.
शनिवारी 20 मार्च रोजी हंडा मोर्चा
बोडणीकरांचा 30 वर्षापासून पाणी प्रश्न जैसे थे आहे. जिल्हा परिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी याच्याकडून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे अखेर बोडणीकर महिलांनी हंडा मोर्च्याचे हत्यार उपसले आहे. 20 मार्च रोजी गावातील महिला ह्या दस्तुरी फाटा येथे रास्ता रोको करून वाहतूक अडवणार आहे.
पाणी प्रशासनाने देणे हा आमचा हक्क
गेली 30 वर्ष बोडणी ग्रामस्थ पाण्यासाठी झगडत आहेत. बोडणीकर हे सुखी समाधानी जीवन जगत आहेत. मात्र पाणी हे जीवन असताना प्रशासनाच्या नियोजन अभावी बोडणीकर पाण्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे पाणी प्रशासनाने देणे हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळविणारच असा पवित्रा बोडणीतील महिलांनी उचलला आहे.