रायगड(पनवेल) - श्रमिक रेल्वेने महाराष्ट्रातून झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील डालटनगंजला गेलेल्या एका महिलेने मुलाला जन्म दिला आहे. रूपा देवी नाव असलेली ही महिला बोकारोतील गोमिया गावची रहिवासी आहे.
पनवेल येथून निघालेल्या श्रमिक रेल्वेने रूपा देवी आज पहाटे तीनच्या सुमारास डालटनगंज येथे पोहचल्या. रेल्वेतून उतरल्यानंतर लगेच त्यांना प्रसूतीवेदना सुरू झाल्या. रेल्वे अधिकाऱ्यांनी तत्काळ पलामू वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाशी संपर्क साधून रुग्णवाहिका बोलवली. पलामू रुग्णालयात रूपादेवीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. आई व बाळाला डॉक्टरांच्या विशेष निगराणी खाली ठेवण्यात आले आहे.
पनवेलमधून गेलेल्या श्रमिक रेल्वेने १ हजार ६०० प्रवासी आज सकाळी पहाटे पलामूतील डालटनगंज येथे पोहचले. झारखंडमधील २३ जिल्ह्यातील कामगारांचा यात समावेश आहे. सर्वांची डालटनगंज रेल्वे स्थानकावर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. श्रमिक स्पेशल रेल्वेने पलामूचे 174, गढवाचे 164, सिमडेगाचे 37, पश्चिम सिंहभूमचे 30, हजारीबागचे 258, रांचीचे 45, बोकारोचे 219, पूर्व सिंहभूमचे 78, कोडरमाचे 53, चतराचे 56, देवघरचे 35, धनबादचे 38, गिरिडीहचे 142, गुमलाचे 18, दुमकाचे 35, साहिबगंजचे55, सरायकेलाचे 3, लातेहारचे 8 , लोहरदगाचे 8, रामगढचे 49 ,जामताडाचे 7, खूंटीचे 35, गोड्डाचे 53 मजूर झारखंडला गेले आहेत.