माथेरान (रायगड) - रविवारी सकाळी माथेरानमधील इंदिरानगर येथे एका घरामध्ये चालवल्या जाणाऱ्या लॉजिंगमध्ये महिलेचा शिर कापलेला मृतदेह आढळून आला. निर्वस्त्र असलेल्या या मृतदेहासोबत कोणतीही वस्तू, तसेच बॅग, ओळखपत्र नव्हते. त्यामुळे, या प्रकरणाची गुंतागुत वाढली असून माथेरानमध्ये औरंगाबादच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.
हेही वाचा - Charulata Tokas Criticizes BJP : भाजपा सामाजिक वातावरण दूषित करून स्वतःचे राजकीय हित साधतेय
याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. रायगड पोलीस गुन्हे अन्वेषण शाखा व माथेरान पोलीस प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.
पोलिसांसमोर मोठे आव्हान
लॉजचा केअर टेकर सकाळी चहा नाश्ता विचारण्यासाठी गेला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच, दरवाजाही लावलेला नव्हता. म्हणून केअर टेकरने आत जाऊन पाहिले असता त्यास महिलेचा विवस्त्र अवस्थेतील शीर नसलेला मृतदेह दिसला. त्यानंतर पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. घटनेची माहिती कळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. रायगड पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका महिलेचे व तिच्यासोबत असलेल्या पुरुषाचे फोटो प्रसारीत केले असून त्यांना ओळखणाऱ्यांनी रायगड पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
एका पुरुषासोबत आलेल्या या महिलेने रूममध्ये इतर कोणतेही सामान सोबत आणलेले नव्हते. तसेच, महिलेसोबत असलेला पुरुषही तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. घरवजा लॉजिंग मालकाने रूम देण्याआधी या पर्यटकांकडून कोणतेच ओळखपत्र न तपासता पर्यटकांनाच रजिस्टरमध्ये नोंद करण्यास सांगून लॉजमालक बाहेर गावी निघून गेला होता.
हेही वाचा - ...अखेर रस्त्यावर धावली लालपरी, रायगड जिल्ह्यातील आठ आगारात बससेवा सुरू