रायगड - नुकताच खोपोली शहरातील शेकापच्या नगरसेवकाने मद्यधुंद अवस्थेत मध्यरात्री हवेत गोळीबार केला होता. त्याने भाजपा नगरसेवकावरील राग मनात धरून रविवारी रात्री दीड वाजता काही मंडळींना सोबत घेऊन धिंगाणा घातला होता. या घटनेची खोपोली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपी नगरसेवक मात्र फरार झाला आहे.
गोळीबार करणारा शेकापचा नगरसेवक मात्र फरार -
खोपोली शहरातील शेकापचे नगरसेवक प्रशांत कोठावळे हे आपल्या सहकारी नगरसेवकाच्या पुतण्याच्या हळदी कार्यक्रमाला रविवारी गेले असताना या ठिकाणी एका व्यक्ती बरोबर किरकोळ वाद झाला होता. त्याठिकाणी मध्यस्थी करून वाद मिटविण्यासाठी भाजपाचे नगरसेवक तुकाराम साबळे यांनी पुढाकार घेतला होता. त्याचा मनात राग धरून शेकापचे नगरसेवक प्रशांत कोठावळे यांनी रविवारी रात्री 1 वाजून 30 मिनिटाच्या सुमारास आपल्याकडील काही मंडळींना बरोबर घेऊन भाजपाचे नगरसेवक तुकाराम साबळे याच्या घरासमोर जाऊन धिंगाणा घालून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याने खोपोली शहरात खळबळ उडाली.
खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -
या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला व खोपोली पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश अस्वर व पोलीस कर्मचारी दाखल होताच कोठावलेसह सहकारी ही पशार झाले आहेत.याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हाय्यक पोलीस निरीक्षक सतिश अस्वर तपास करीत आहेत.
हेही वाचा -'एटीएस', 'एनआयए' आधी मुंबई पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे पळविले