रायगड: उरण तालुक्यातील करंजा बेटावर असणाऱ्या नौदलाच्या बेस कॅम्पमध्ये (Naval base camp in uran) काम करणारा 22 वर्षीय विशाल महेशकुमार हा ऑफिसर बेपत्ता झाला आहे. (22 year old Navy officer missing). मात्र याबाबत नौदलाकडून योग्य सहकार्य मिळत नसून, संबंधित प्रकाराबाबत संशयास्पद हालचाली दिसत असल्याचा आरोप विशाल महेशकुमार यांच्या परिवाराकडून करण्यात येत आहे. संपूर्ण प्रकाराबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
विशालच्या बेपत्ता होण्याबाबत पालकांचा संशय: मिळालेल्या माहितीनुसार, 3 नोव्हेंबर रोजी नौदलाच्या बेसकॅम्पमधून उरण शहरातील स्विमिंग पुलवर पोहण्यासाठी आलेला 22 वर्षीय विशाल महेशकुमार हा तरुण अचानक गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकाराबाबत नौदलाकडून उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येत असून, संबंधित प्रकाराबाबत नातेवाईक संशय व्यक्त करत आहेत. विशाल नौदलामध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत असून, नौदलाकडून विशाल हरवल्याची कोणतीही तक्रार करण्यात आली नाही. स्विमिंग पुलवर विशालची पार्क करण्यात आलेली मोटारसायकल नौदलाकडून गुपचूप का नेण्यात आली. तसेच विशाल बाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास का टाळाटाळ केली जात आहे? विशाल हरवल्यानंतर मुख्य अधिकारी व विशालचा मित्र अचानक रजेवर का जातात? या प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळत नसल्याने विशालचे नातेवाईक नौदलाच्या हालचालीबाबत संशय व्यक्त करत आहेत. आता या घटनेबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
आई-वडिलांचा आत्मदहनाचा इशारा: विशाल बेपत्ता झाल्याला चार दिवस झाले असून, आत्तापर्यंत कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत. विशालचा पत्ता लागावा अशी मागणी आई वडीलांकडून करण्यात येत असून, विशालबाबत कोणतीच माहिती मिळाली नाही तर आत्मदहन करणार असल्याचेही आई-वडिलांनी म्हटले आहे. नौदलाच्या बेसकॅम्पमधून एक ऑफिसर बाहेर येतो आणि बेपत्ता होतो, यावर नौदलाकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नाही हे सगळं संशयास्पद असल्याचं नातेवाईक म्हणत असून, याबाबत तात्काळ चौकशी झाली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे.