रायगड - उरण तालुक्यात एकाच कुटुंबातील 21 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 234 वर पोहचली आहे. करंजा गावातील हे कुटुंब आहे. या 21 पैकी 15 जणांना नवी मुंबईच्या एमजीएम कामोठे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील कोरोनारुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्याची वाटचाल रेड झोनकडे होताना दिसत आहे.
उरणमध्ये कालपर्यंत कोरोनाचे फक्त चार रूग्ण होते. मात्र, आज एकाचवेळी 21 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ माजली आहे. आरोग्य तपासणी करणाऱ्या आशा सेविकेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला. कुटुंबातील एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने बाकीच्या 20 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे उरण आणि करंजा गाव पूर्ण सील केले असून कोरोनाबाधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आता भीतीचे वातावरण पसरले आहे.