रायगड - माणगावातील क्रीपझो कंपनी स्फोटात जखमी झालेल्या 3 कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या कामगारांवर नवी मुंबईतील नॅशनल बर्न सेंटर येथे उपचार सुरू होते. दरम्यान, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - रायगडमधील क्रीपझो कंपनीत बॉयलरचा स्फोट, १८ जण जखमी
आशिष येरूनकर, कैलास पाडावे व राकेश हळदे अशी मृत कामगारांची नावे आहेत. क्रीपझो कंपनीत झालेल्या स्फोटात 14 कामगार जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आळे होते. यातील तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. अजूनही तीन जण आयसीयूमध्ये असून 11 कामगारांवर जनरल वार्डमध्ये उपचार सुरू आहेत.
माणगाव तालुक्यातील विळभगाड औद्योगिक क्षेत्रातील क्रीपझो प्रा. लि. कंपनीत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. यामध्ये 18 जण जखमी झाले होते. यातील ५ कर्मचारी हे गंभीर भाजल्याने त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात हलविण्यात आले होते. तर, इतर कर्मचाऱ्यांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. ही कंपनी आग विझवण्यासाठी आवश्यक असलेली सिस्टम तयार करते.