रायगड - जिल्ह्यात रोहा तालुक्यात वरसगाव तलावात एक तर पेण तालुक्यात अंबा नदीत एक असे वेगवेगळ्या ठिकाणी २ जण बुडाल्याची घटना आज दुपारी घडली आहेत. अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांना स्थानिक ग्रामस्थ मदत करत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात २ दिवसात एकूण ७ जण बुडाले आहेत.
आशिष शेफूड (वय ४०, रा. महादेव वाडी, धाटाव, रोहा) आणि रवी चव्हाण (वय ४० रा. चुनाभट्टी, मुंबई) असे बुडलेल्यांची नावे आहेत. रोहा तालुक्यातील कोलाड येथील आशिष शेफुडे हे वरसगाव येथे तलावात मित्रांसोबत पोहण्यास गेले होते. त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
रवी चव्हाण हे आपल्या मित्रांसोबत निगडे येथे फिरण्यास आले होते. त्यावेळी निगडे गावात असलेल्या नदीत रवी चव्हाण हे पोहण्यास गेले असता, नदीच्या प्रवाहात वाहून गेले. निगडे गावचे ग्रामस्थ आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने वडखळ पोलीस शोध घेत आहेत. आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने शोध सुरू आहे. परंतु, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस असून जिल्ह्यातील नद्यांची पातळी वाढली होती. या वाढलेल्या पाण्याच्या पातळीत आतापर्यंत ७ जण बुडाल्याची घटना घडली असून यापैकी ५ जणांचे मृतदेह सापडले आहेत. आज बुडालेल्या दोघांचा शोध सुरू आहे.