रायगड - जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्हा परिषदेच्या 186 शाळांचे नुकसान झाले आहे. शाळा, स्वछतागृहे, स्वयंपाकगृहांच्या दुरुस्तीसाठी साधारण 4 कोटी 11 लाख 70 हजार रुपये निधी आवश्यक असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.
अतिवृष्टीमुळे रायगड जिल्हा परिषदेच्या 186 शाळा मोडकळीस शाळा दुरुस्त होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय इतरत्र करण्यात आली आहे. मात्र, कमकुवत शाळांची दुरुस्ती जिल्हा परिषदेने अगोदरच केली असती, तर ही बिकट स्थिती निर्माण झाली नसती.दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. या अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना चांगलाच फटका बसला आहे. जिल्ह्यातील आपटवणे (पाली), कसबे (महाड), पोलादपूर (चांदके), आदगाव (श्रीवर्धन), वारळ आदिवासी शाळा (माणगाव) या शाळांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे.रायगडमधील साधारण साडेपाचशे शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
शाळा दुरुस्तीसाठी 2018-19 या वर्षासाठी 16 कोटींची मागणी शासनाकडे केलेली होती. मात्र अद्याप त्यासाठी निधीची तरतूद झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी आठ कोटींचा निधी मंजूर केला आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून अद्याप नादुरुस्त शाळांची यादी प्राप्त झालेली नाही. यादी आल्यानंतर समितीमार्फत नादुरुस्त शाळेला दुरुस्तीची गरज आहे का? हे पाहूनच निधी वितरित केला जाईल, असे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शाळा
उरण 14, पनवेल 7, पेण 10, पोलादपूर 11, म्हसळा 10, मुरुड 13, महाड 14, माणगाव 8, रोहा 12, अलिबाग 18, सुधागड 45, श्रीवर्धन 3, खालापूर 4, कर्जत 16, तळा 1