पेण (रायगड)- कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्याकरिता जाहीर केलेल्या शनिवार व रविवारच्या लॉकडाऊनला पेण तालुक्यातील व्यापारी व नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. पेण तालुक्यात वीकेंड लॉकडाऊन 100 टक्के यशस्वी झाला आहे.
पेणमधील नेहमी गजबजलेले भाजीपाला मार्केट व बाजारपेठा निर्मनुष्य झाल्या आहेत. त्याचप्रमाणे शहरातील रस्तेही निर्जन झाल्याचे दिसून आले आहे. अत्यावश्यक सेवेतील सरकारी कर्मचारी, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, एसटीचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, पेट्रोल पंप कर्मचारी, पत्रकार, डॉक्टर्स व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी होती. त्यामुळे या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याव्यतिरिक्त सामान्य नागरिक घराबाहेर पडलेच नाहीत.
हेही वाचा-अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अॅलर्जी; राहुल गांधींची केंद्रावर टीका
पेण तालुक्यातील नागरिकांनी वीकेंडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्याचे यावेळी दिसून आले. पेणमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेला वीकेंड लॉकडाऊन यशस्वी होण्याकरिता प्रशासनाने प्रयत्न केले आहे. यामध्ये पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार डॉ.अरुणा जाधव, पेण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे, उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण यांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ, वडखळ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, दादर सागरी सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा-'चिपी विमानतळाचे काम दळभद्री ''आयआरबी''ला देऊन राणेंनी वाट लावली'