रायगड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येत आहे. अशा वेळी अलिबाग शहराला लागून असलेल्या कुरूळ ग्रामपंचायतीने स्वतः हून गावात आज शंभर टक्के जनता कर्फ्यू जाहीर केला असून, नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
कुरुळ ग्रामस्थांचा 'एक दिवस गावसाठी' जनता कर्फ्यु 'एक दिवस गावसाठी' ही संकल्पना कुरुळ ग्रामपंचायताचे सरपंच अॅड. जनार्दन पाटील यांनी गावात राबवली आहे. त्यामुळे कुरुळ गाव हे आज पूर्णतः निर्मनुष्य पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी काळात अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा असे जिल्हाधिकारी यांचे आदेश नागरिकांना दिले आहेत. मात्र, संचारबंदी काळात नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आदेश असताना नागरिक बाहेर पडत आहेत. गर्दी टाळणे महत्त्वाचे असून, त्यामुळे कोरोनासारख्या शत्रूला ठरविण्यास मदत होणार आहे. मात्र, याकडे नागरिक अजूनही कानाडोळा करत आहेत. प्रशासनाला नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे.
अलिबाग शहराला लागून कुरुळ ग्रामपंचायत आहे. कुरुळ ग्रामपंचायत सरपंच जनार्दन पाटील यांनी गावातील ग्रामस्थांच्या आरोग्य सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे. यासाठी कोव्हिड-19करिता नियंत्रण कक्षही स्थापन केला आहे. ग्रामस्थांच्या आरोग्य सुरक्षेसाठी एक दिवस गावसाठी ही संकल्पना राबवली आहे. यादिवशी कोणीही कुठल्याच कामासाठी सकाळी 7 ते रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान घरातून बाहेर पडू नका, अशा सूचना ग्रामस्थांना करण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनीही ही सूचना पाळली असून, संपूर्ण गाव हे आजच्या दिवशी निर्मनुष्य झाले आहे. ग्रामपचायतीमार्फत गरजू व्यक्तींना धान्य वाटपही करण्यात येणार आले आहे. तर कोव्हिड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात 50 तरुणाचे दक्षता पथकही स्थापन केले आहे.शासन आणि प्रशासन हे कोव्हिड-19च्या अनुषंगाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलत आहे. स्थानिक प्रशासन असलेल्या ग्रामपंचायतींनीही आपल्या नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी स्वतःहून पावले उचलणे महत्वाचे आहे. कुरुळ ग्रामपंचायतीने असे पाऊल उचलून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे इतर ग्रामपंचायतींनीही हा पायंडा पाळल्यास कोरोनासारखा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत मिळणार आहे.