पेण - मुंबई गोवा महामार्गावरील पेण जवळ असलेल्या भोगावती नदीच्या (Bhogavati river) पात्रात पुलाखाली 10 ते 12 जिलेटिनच्या कांड्या सापडल्या आहेत. (10 to 12 sticks of gelatin found). गुरुवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला असून पोलीसांनी परिसरात नाकाबंदी केली आहे. रायगडसह नवी मुंबई येथील बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. सदर जिलेटीन कांड्या निकामी करण्याचे काम सुरू आहे.
मार्गावरील एकेरी वाहतूक बंद - याबाबतचे वृत्त समजताच पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह पोलीस अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांत विठ्ठल इनामदार, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, नायब तहसिलदार प्रसाद कालेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पेण तालुक्यातील तिन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांनाही तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या कांड्या वाहून आल्या की कुणी टाकल्या याबाबत मात्र अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. पोलिसांनी खबरदारी म्हणून या मार्गावरील एकेरी वाहतूक बंद केली आहे. तात्पुरत्या स्वरुपात दुसऱ्या बाजूची वाहतूक सुरु आहे. मात्र मुंबई गोवा महामार्ग दोन्ही बाजूने बंद करण्यात आला आहे.